पुणे : कडाक्याच्या थंडीने अवघे राज्य गारठले | पुढारी

पुणे : कडाक्याच्या थंडीने अवघे राज्य गारठले

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : हिमालयाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रही गारठला आहे. बुधवारी महाबळेश्वर येथे पारा 0 अंशावर होता. दरम्यान, 16 जानेवारीनंतर पुन्हा राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने बुधवारी वर्तविला.

उत्तर भारतात राजस्थान आणि आसपासच्या भागात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाला आहे. त्यामुळे उत्तर भारतातील सर्व राज्य गारठले आहे. या भागाकडून राज्याकडे शीतलहर येत असल्याने राज्यातही दिवसभर गारठा निर्माण झाला. रात्री देखील कडाक्याची थंडी जाणवत आहे.या थंडीमुळे किमान तापमानात फारशी घट नसली तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून मध्य भारताकडे वाहत असलेल्या बाष्पयुक्त वा-यामुळे राज्यात थंडी वाढली आहे.

दरम्यान, दक्षिण कर्नाटक ते दक्षिण छत्तीसगड या भागात द्रोणीय स्थिती आहे. त्याचबरोबर दक्षिण कोकणात चक्रीय स्थिती कायम आहे. उत्तर भारतात 16 जानेवारीनंतर हिमालयात नवीन पुन्हा चक्रावात धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शीतलहर अनुभवायला मिळणार आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे या भागात थंडी वाढणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांचा कडकडाट पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील तापमान

कोल्हापूर- 12.8, पुणे-11.4, लोहगाव-13.3, नगर- 14, जळगाव-12.2, महाबळेश्वर-9.6, मालेगाव-12.2, नाशिक-10.3, सांगली-12.1, सातारा-12, सोलापूर-16, मुंबई-16.2,सांताक्रुझ- 14.4, डहाणू-14.1, औरंगाबाद-11.6, परभणी-16.4, नादेड-17.6, अकोला-16.6, अमरावती-13.1, बुलढाणा-13.2, चंद्रपूर-17.2, गोंदिया-14, नागपूर-15.6, वाशीम -14, वर्धा-15.4.

Back to top button