

वाडा :वाडा तालुक्यासह पालघर व ठाणे जिल्ह्यातील विविध भागात अल्पवयीन कातकरी समाजाच्या मुलींची परजिल्ह्यात विवाहासाठी होणारी विक्री चिंतेचा विषय बनला आहे. तालुक्यातील मांगाठणे गावात दलालामार्फत एका अल्पवयीन मुलीचे लग्न संगमनेर येथील एका तरुणाशी ठरविण्यात आले असून पैशांच्या मोबदल्यात होणारा हा बालविवाह श्रमजीवी संघटनेच्या हस्तक्षेपानंतर रोखण्यात प्रशासनाला यश आले. वाडा पोलिसांनी मात्र त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात कुचराई केल्याने गंभीर गुन्हा असूनही कुणालाही ठोस शासन झाले नाही असे सरचिटणीस विजय जाधव यांनी सांगितले.वाडा पोलिसांच्या या हलगर्जीचा निषेध करण्यासाठी शेकडो महिलांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर तब्बल 3 तास मूक आंदोलन केले.
अल्पवयीन कातकरी समाजातील मुलींची पैशांसाठी होणारी विक्री हा पालघर व ठाणे जिल्ह्याला शाप असून आतापर्यंत वाडा, कासा, जव्हार, गणेशपुरी, शहापूर अशा विविध पोलीस ठाण्यात याबाबत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वाडा तालुक्यातील मांगाठणे गावात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह संगमनेर येथील पर जातीच्या मुलाशी 16 ऑक्टोबरला निश्चित झाला असून त्यासाठी 40 हजारांची दलालाच्या माध्यमातून देवाणघेवाण झाली होती. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात हस्तक्षेप केल्याने हा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले मात्र आरोपींना मोकळीक दिल्याने संघटना संतप्त झाली आहे.
मंगळवारी शेकडो महिला कार्यकर्त्यांनी तोंडाला काळया पट्ट्या बांधून वाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर जवळपास 3 तास मूकमोर्चा आंदोलन करून पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला. वाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा संपूर्ण, निष्पक्ष व वेगवान तपास करण्यात यावा, गुन्ह्यात सहभागी असणारे दलाल, आयोजक व सहकारी व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तपास निष्काळजीपणा केली असल्यास संबंधित सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी व पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, राज्य पातळीवर या प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष तपास पथक व आदिम जमातीच्या मुलींच्या संरक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा अशा आंदोलकांच्या मागण्या होत्या.
स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही अल्पवयीन कातकरी मुलींना जनावरांसारखे विकले जात असेल तर ही निश्चितच लाजिरवाणी घटना आहे, पोलिसांची केलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष गंभीर असून बालहक्क समितीचे हे अपयश आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली आहे. वाडा येथील आंदोलनाला भेट देऊन पंडित यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले शिवाय वाडा पोलिसांची चांगलीच कानउघडणी देखील केली. उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. मेहेर हे वाडा पोलीस ठाण्यात यावेळी उपस्थित होते.