पुढारी वृत्तसेवा : डहाणू तालुक्यातील धरमपूर येथील शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने दोन महिलांची प्रकृती गंभीर झाली आहे. वंदना संजय भगत (वय 25) ,राहणार धरमपूर आणि ज्योती वसंत हिंगाडी (वय 19) या दोन विवाहित महिलांवर सोमवारी (दि.14) सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विजा कोसळल्या. त्या आपल्या शेतात भात गोळा करत असताना अचानक विजांचा कडकडाट झाला व विजेचा प्रचंड आघात झाला.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, वीज कोसळल्यानंतर दोन्ही महिलांना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथम त्यांना प्राथमिक उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही महिलांची प्रकृती अजूनही गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परतीच्या पावसामुळे विजांचा कडकडाट होत असताना ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.