खानिवडे : पालघर जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे काम भूमीपूजना नंतर ही पोच रस्ता, संरचना आराखडा यासह इतर तांत्रिक अडचणी यामुळे धीम्या गतीने सुरू होते. आता सर्व अडचणी दूर झाल्यानंतर या कार्यालयाच्या बांधकामाला गती मिळाली असून आतापर्यंत ४० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे आता प्रशस्त जागेत कामकाज होणार आहे.
वसई पूर्वेच्या गोखीवरे येथील ३.३ हेक्टर जागेत पालघर जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाची इमारत ही दोन मजली असून यात २४ हजार ९१२ चौरस फुटांचे बांधकाम त्यात केले जाणार आहे. यासाठी सुमारे १३.९७ कोटी इतका निधी खर्च केला जाणार आहे. मात्र भूमीपूजनानंतर आरसीसी संकल्पनाची कन्सल्टंट करून तपासणी, १२ मीटर लांबीचा पोहच रस्ता, यासह इतर तांत्रिक अडचणी यामुळे काम सुरू झाले नव्हते.
डिसेंबर २०२४ मध्ये सर्व अडचणी दूर झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक स्लॅब पडला असून दुसरा स्लॅब ही टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधी मध्ये संपूर्ण इमारतीचे आरसीसी स्ट्रक्चरचे काम पूर्ण केले जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन प्रादेशिक कार्यालयाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वेळोवेळी त्या कामाचा आढावा घेतला जात आहे. एप्रिल ते मे यादरम्यान त्या कार्यालयात जायला हवे असे आमचे उद्दिष्ट आहे.
अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई,