पालघर : मुंबई, अहामदाबाद महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आहे. नांदगाव, जव्हार फाटा आणि सातिवली येथील निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमुळे नांदगाव फाटा ते सातिवली दरम्यानच्या सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. गुजरात मार्गीकेवर ढेकाळे वाघोबा खिंड तर मुंबई मार्गीकेवर चिल्हार फाट्यापर्यंत वाहतूक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान मस्तान नाका,जव्हार, टेन नाका, वरई फाटा वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरत आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत आहे. रविवारी चौथ्या दिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने वाहन चालकांनी मोठी गैरसोय होत आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्याच्या कामात महामार्ग वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि मनोर पोलीस अपयशी ठरल्याने सलग चौथ्या दिवशी वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.
नांदगाव फाटा आणि जव्हार फाटा उड्डाणपुलांचे काम करणाऱ्या आर सी पटेल नामक ठेकेदारांकडून वाहतूक नियमन करण्यासाठी ट्राफिक वार्डन नेमले जात नाहीत तसेच पाऊस थांबलेला असताना सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण विद्यार्थी आणि कामगारांना बसत आहे. पंधरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या प्रवसाला तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जात असून इंधनाच्या खर्चात वाढ झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनोर विक्रमगड रस्ता, वाडा मनोर रस्ता, मनोर पालघर रस्ता आणि वरई पारगाव रस्त्यासह वरई फाट्या वरून पालघर जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या दहिसर बहाडोली दरम्यानच्या अरुंद पुलावर वाहतूक मोठी कोंडी होत आहे. पुलाच्या दहिसर बाजूला वाहनांच्या एक ते दीड किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्या होत्या. सिग्नल यंत्रणा कोलमडूना पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीला कंटाळलेले वाहन चालक स्वतः वाहतूक नियंत्रण करीत होते.