

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पेट्रोग्रेट मेटल या कारखान्यातील कामगारांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने बुधवारी सकाळी एकच खळबळ उडाली. ही घटना सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास घडली असून, कामगारांनी संबंधित कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत हल्लाबोल केला.
दरम्यान, तपासात समोर आले आहे की पेट्रोग्रेट कंपनीच्या शेजारी असलेल्या एका कारखान्यात इनऑर्गानिक पिगमेंट उत्पादन प्रक्रिया सुरू असताना, डायर मशिनमध्ये सुकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कपड्याची बॅग फुटल्याने उत्पादन हवेत सर्वत्र पसरले. त्यामुळे लगतच्या कारखान्यांतील कामगारांना श्वसनाचा त्रास होऊ लागला.या घटनेनंतर संतप्त कामगारांनी संबधीत कारखान्याच्या गेटसमोर एकत्र येत घोषणाबाजी केली. धोकादायक उत्पादन प्रक्रियेसाठी वापरल्या जाणार्या रचनांचा तात्काळ वापर बंद करण्याची मागणी कामगारांनी केली. काही वेळातच परिस्थिती तापली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनाही तपासासाठी बोलावण्यात आले.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने तपास सुरू केला असून, हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सेन्सरयुक्त यंत्रणा त्या ठिकाणी लावण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे स्पष्ट झाले आहे की, डायर यंत्रातून उत्पादन प्रक्रिया करताना हवेत मिसळणारे कण रोखण्यासाठी आवश्यक असलेले “डस्ट कलेक्टर” यंत्र बसवल्याचे नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित कारखान्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक कामगार संघटनांनी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर एमआयडीसीतील इतर अनेक कारखान्यांतील कामगारांनीही सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली आहे.