पालघर : पालघर जिल्हा परिषदेसाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेमधून आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम अशा विविध विभागांसाठी पात्र उमेदवार जिल्हा परिषदेला अधिकारी म्हणून मिळाले असून या अधिकारी वर्गाला नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा सभागृहामध्ये या नियुक्ती पत्रांचे वाटप बांधकाम व आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जागृती संखे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा राजेश पाध्ये यांच्या उपस्थितीत केले गेले. आरोग्य विभागातील विविध औषध निर्माण अधिकारी, बांधकाम व पाणीपुरवठा विभागातील सहायक स्थापत्य अभियांत्रिकी व कनिष्ठ अभियंता या पदांसाठी अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
जिल्हा स्थापन झाल्यापासून पालघर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांची जी पोकळी होती ती भरून काढायचा हा चांगला प्रयत्न असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती आहे, आरोग्य विभागामध्ये काम करणारे कर्मचारी हे नोकरी नाही तर समाजाची सेवा करीत असतात, नवीन उमेदवारांना देखील मी हे आवाहन करतो की या जिल्ह्यातील आदिवासी, दलित, पीडित बहुजन समाजाची सेवा ही आपल्या हातून घडो, अशा भावना यावेळी सभापती संदेश ढोणे यांनी व्यक्त केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी औषध निर्माण अधिकारी पदाचे २५ आदेश, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम विभागाचे ३५ आदेश, तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाचे बांधकाम विभागा मधील ५ तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील १५ उमेदवारांना यावेळी आदेश वितरित करण्यात आले.