

वाडा : मच्छिंद्र आगिवले
साप हा शेतकऱ्यांचा जरी मित्र असला तरी अंगणात आलेला साप लोकांना दुश्मन वाटतो. वाडा शहरात तर साप दिसला की अनेकांच्या अंगाचा थरकाप उडून हात आपसुक काठ्या शोधू लागतात. वाडा शहरात राहणाऱ्या एका ध्येयवेड्या सर्पमित्राने मात्र साप व माणसातील हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला असून साप दिसताच लोक काठी ऐवजी आता मोबाईलमध्ये त्याचा नंबर शोधतात हा त्याचाच परिणाम म्हणावा लागेल.
वाडा शहरात राहणारा जमीर फनकर हा सर्पमित्र म्हणून नावारूपाला असून विक्रमगड, मनोर, भिवंडी, अघईसह वाडा परिसरात साप पकडायला जातो. लहानपणापासूनच जमीरला प्राण्यांची भारी आवड असून नववीत असताना गावातील शकील बाबा यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्याने जवळपास ७ वर्षे साप पकडण्यासाठी त्यांची सोबत देऊन सराव केला.
जगात आपली काहीतरी वेगळी ओळख असायला हवी या हेतूने जमीर काम करू लागला ज्यात त्याला अनेक कटु अनुभव देखील आले. जेव्हा एक साप माणसाच्या वस्तीतून पकडून तो जंगलातील नैसर्गिक अधिवासात त्याची सुटका करतो तेव्हा जमीर याला आपण करीत असलेल्या कामाचे खरे सुख मिळते असे तो सांगतो.
साप व माणसात मोठी दरी निर्माण झाली असून गैरसमजातून होणाऱ्या या घटना आपण निश्चितच टाळू शकतो असे जमीरचे म्हणणे असून १४ वर्षात त्याने हजारों सापांची सुखरूप सुटका करून त्यांना जीवनदान दिले आहे. जखमी सापांवर तो उपचार देखील करीत असून साप दिसला की काठी ऐवजी मोबाईल घेऊन जमीरला संपर्क करा असे आवाहन तो करतो.
दोन वेळा जमीर याला सापाने दंश देखील केला असून तो आजही सुखरूप आहे हे त्याने कमावलेले पुण्य आहे असे तो मानतो. नाग, मण्यार, फुडसे, घोणस अशा प्रमुख विषारी सापांच्या प्रजातींसह अनेक बिन विषारी सापांची सुटका व देखभाल त्याने केली आहे.
शहरासह गावाकडील लोकं देखील सध्या साप दिसला की सर्पमित्र शोधतात ही सकारात्मक बाब आहे. शासनाने देखील यासाठी जास्तीतजास्त जनजागृती करायला हवी. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कामात मोलाचे सहकार्य करीत असून यामुळे अवैध कामांना देखील आळा बसविणे शक्य होते.
एकेकाळी माणसाचा मित्र असलेला साप दुश्मन कधी बनला कळलं नाही मात्र आता लोक पुन्हा त्याला मित्र मानून आम्हाला जीवनदान देण्यासाठी आवाज देतात हेच आमच्या कामाचे खरे फलित आहे. मरेपर्यंत हे सेवरूपी काम मी करीत राहणार आहे, मात्र सरकारी दवाखान्यात सर्पदंश उपचारासाठी सर्वतोपरी उपाययोजना उपलब्ध असायला हव्यात.
जमीर फनकर, सर्पमित्र, वाडा