Palghar News | वसईत पावसाची पुन्हा बरसात

भातपीक भुईसपाट झाल्याने बळीराजा चिंतेत
Palghar News
वसईत पावसाची पुन्हा बरसातPudhari News
Published on
Updated on

खानिवडे: हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज तंतोतंत खरे ठरवत सोमवारी दुपारनंतर पावसाने वसईत दमदार हजेरी लावली. यामुळे दाणा भरून कापणीला आलेली हळवी पिके अनेक शेतात आडवी पडली आहेत. हळव्या पिकांच कसं होईल याची घोर चिंता शेतकऱ्यांना लागली असून अगदी आताच निसवणी धरून फुलोरा लागलेल्या निम गरव्या पिकांचा फुलोरा तग धरून राहील का याची ही काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे. मात्र याच बरोबर आताच पोटरी धरलेल्या अधिक दिवसांच्या गरव्या पिकांना या पावसामुळे एक प्रकारे संजीवनी मिळाल्याने गरव्या शेतीचे शेतकरी सुखावले आहेत. त्यामुळे वसईच्या शेतकऱ्यांमध्ये कही खुशी तर कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कडक ऊन आणि असह्य उकाडा सहन करणाऱ्या वसईच्या नागरिकांना सोमवारी सकाळपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आणि दुपारनंतर बरसलेल्या पावसामुळे तयार झालेल्या आल्हाददायक वातावरणात उकाड्यापासून दिलासा मिळाला. वसईत कसण्यात येणारी भातशेती ही जमिनीच्या उंच, मध्यम आणि सखल भागाप्रमाणे तीन प्रकारामध्ये मोडते. यात सर्वात जलद येणाऱ्या पिकाला हळवे पीक सांगितले जाते. हे पीक ज्या खाचरात घेतले जाते ते माळरानावर उंच ठिकाणी आणि लागलीच पाण्याचा निचरा होणारी जमीन असते तेथे घेतले जाते. आता हे पीक कापणीला आले आहे.

या पिकाचा कालावधी हा ८०ते १०० दिवसांचा असतो. तर निम गरवे पीक हे सर्वसाधारण पाण्याचा निचरा कमी होणाऱ्या जागेत घेतले जाते. याचा कालावधी हा ९० ते१२० दिवसांचा असतो. हे पीक येत्या १० ते पंधरा दिवसांत कापणीच्या तयारीत आले असेल. तर पाणी धरून ठेवणाऱ्या काहीश्या पाणथळ जागेत गरवे पीक घेतले जाते ज्या पिकाचा कालावधी हा १२० ते १४५ दिवसांचा असतो यामध्ये वातावरणाची स्थिती कशी असते यावर साधारण दहा ते २० दिवसांचा कालावधी हा कमी अधिक प्रमाणात असू शकतो. दरम्यान कापणीयोग्य भातपीक भुईसपाट झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news