पालघरः पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गण निहाय आरक्षणाची सोडत सोमवारी सकाळी पालघर तहसील कार्यालयातील सभागृहात पार पडली. पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
पालघर पंचायत समितीच्या एकूण ३४ गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी अकरा तर नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी नऊ, एक गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. उर्वरित तेरा गण खुल्या प्रवर्गासाठी राखीव राखीव आहेत. पंचायत समितीच्या गणांच्या विविध प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी लहान मुलीच्या हाताने चिठ्या काढण्यात आल्या.
पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण सोडतील पालघर पूर्व भागातील मनोर वगळता दहिसर तर्फे मनोर, हालोली, कोसबाड, निहे, सोनावे, धुकटन, नंडोरे आणि बच्हाणपूर आठ गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड झाला. बोईसर भागातील पाच पंचायत समिती गण महिलांसाठी आरक्षित झाल्याने बोईसर भागात महिला राज येणार आहे. पंचायत समितीच्या क्षेत्रातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकरा गणापैकी सहा गण महिलांसाठी, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या एकूण नऊ गणांपैकी पाच गण महिलांसाठी आरक्षीत झाले आहेत.
सर्वसाधारण उमेदवारांसाठी असलेल्या तेरा गणांपैकी पाच गण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. पंचायत समितीच्या एकूण ३४ गणांपैकी अनुसूचित जातीसाठी असलेला एक गण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. पालघरचे उपविभागीय अधिकारी शाम मदनूरकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोडतीत तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचायत समितीचे आरक्षण निश्चिती झाल्यानंतर इच्छुकांसह राजकीय पक्षांकडून आरक्षित जागांवर योग्य उमेदवारांची शोधाशोध सुरु झाली आहे.
नागरिकांना मागास प्रवर्ग एकूण गण ०९
सालवड (महिला), सरावली धोंडिपूजा (महिला), खैरापाडा (महिला) मनोर (महिला), शिरगांव (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग माहीम, माकृणसार, उमरोळी आणि सातपाटी
अनुसूचित जमातीसाठी राखीव गण ११
दहिसर तर्फे मनोर (महिला), हालोली (महिला), शिगाव (महिला), कोसबाड (महिला), निहे (महिला) आणि सोनावे (महिला)
अनुसूचित जमाती
गुंदले, नंडारे, ब-हाणपूर, धुकटन आणि केळवे अनुसूचित जाती एकूण गण ०१ पास्थळ (महिला)
सर्वसाधारण एकूण गण १३
कुरगाव (महिला), दांडी (महिला), काटकर पाडा बोईसर (महिला ) वंजारवाडा बोईसर (महिला) आणि सरावली (महिला) सर्वसाधारण तारापूर, नवापूर, बोईसर, दांडीपाडा बोईसर, मुरबे, एडवण, टेंभीखोडावे, उंबरपाडा आणि नंदाडे