वाडा : ग्रामीण भागात आजही शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांना मोठा मान आहे. मात्र याच दुर्गम भागातील शाळेत अवेळी जाणाऱ्या शिक्षकांमुळे मुलांच्या शैक्षणीक भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ओगदा ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या शाळांची पाहणी केली असता वेळेच्या तासभर शिक्षक उशिरा आल्याचे लक्षात आले असून याबाबत कठोर भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे. तिळमाळ शाळेत ११.१५ वाजता गेल्यावरही या ठिकाणी शिक्षक उपस्थित नसून शाळेला तर चक्क टाळे पहायला मिळाले.
शिक्षक नाही म्हणून विद्यार्थीही लंपास असून गावातील लोकांना हे नित्याचेच झाले आहे. घोडसाखरे या शाळेवर हीच अवस्था असून येथील विद्यार्थ्यांनी मात्र शिस्तीत आपली जागा पकडून शिक्षकांची वाट बघणे पसंत केल्याचे पहायला मिळाले. ग्रामीण भागात हे प्रकार नवीन नसून शिक्षक शाळेत येतात हीच मोठी गोष्ट लोकांना चाटते. सकाळी १०.२० ही शिक्षकांची वेळ असून अन्य कोणतेही काम या वेळेच्या आधीच आटोपून शाळेत वेळेवर जाणे बंधनकारक असल्याचे अधिकारी सांगतात.
ग्रामीण भागात मात्र या वेळेला हरताळ फासला जात असून अशा गुरुजींची मात्र शाळा घेणे गरजेचे आहे. आधीच जिल्हापरिषद शाळांना घरघर लागली असून त्यात लेटलतिफ शिक्षकांमध्ये मुलांचे नुकसान होत असून याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.