

खानिवडे : विश्वनाथ एस कुडू
या वर्षी मान्सूनने आपले आगमन वेळे आधी एक महिनाभर अगोदर केले . 7 जून ऐवजी 7 मे पासून तो धो धो कोसळला. यामुळे पावसाचा कालावधी हा नेहमीपेक्षा अधिक वाढला असल्याचे यंदा दिसून येत आहे. यामुळे जवळपास पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकर्यांचे शेती नियोजन विस्कळीत केले आहे. पावसाच्या लांबलेल्या सत्रामुळे भात, भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना मोठा फटका बसला आहे.
अनेक ठिकाणी पिकांची मुळे कुजली, तर खरिपात जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या भातशेती लागवडीचे पीक अगदी येण्याच्या वेळेवर झालेल्या वादळी वार्यात हळव्या पिकांचे चिखलात लोळणारे भात पीक आणि भाज्यांमुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. याचबरोबर सतत ओलसर हवामान आणि कमी सूर्यप्रकाशामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगराई वाढली. यात निम गरवे व गरव्या भात पिकांवर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. भाजी पिकात विशेषतः टोमॅटो, वांगी, भेंडी, पालेभाज्या यांसारख्या पिकांवर कीडरोगांनी थैमान घातले. यामुळे यंदा जिल्ह्याच्या शेतमालाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, सलग पावसामुळे मातीचा ओलावा अत्याधिक झाल्याने भात पिकाच्या कापण्या लांबल्या आहेत.त्यामुळे पुढे येऊ घातलेल्या रब्बी हंगामासाठी जमिनीची मशागत उशिरा सुरू होईल. त्यामुळे वाल,तूर, हरभरा, मूग, उडीद, चवळी यांसारख्या पिकांच्या पेरणीस विलंब होण्याची शक्यता आहे. याचबरोबर जिल्ह्यात भात कापणीनंतर भाजी पिकांची सुद्धा लागवड केली जाते. याला जिल्ह्यात काशीवाडी असे संबोधतात.या काशिवाडीत मुळा,टोमॅटो, मिरची,वांगी,कारेली, दुधी,भेंडी ,गोराणी,ची तर वाफे करून कोथिंबीर, पालक,मेथी व सफेद कांद्याची लागवड करण्यात येते.
दिवाळीनंतर अश्या लागवडीसाठी शेतकर्यांची लगबग सुरू होते. ती यंदा आतापर्यंत कोसळलेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा जास्त काळ राहणार असल्याने त्यांची लागवड सुद्धा लांबणार आहे.यामध्ये सद्ध्या पालघर, ठाणे, नाशिक, रत्नागिरीसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत अजूनही हलका पाऊस सुरू असल्याने शेतकर्यांची चिंता अधिक वाढली आहे. पावसाचा हंगाम इतका लांबला की पिकं वाचवणं कठीण झालं. लागवडीचा खर्च परत येईल की नाही, याची भीती आहे,असे एका शेतकर्याने सांगितले.
दरम्यान, कृषी अधिकारी आणि हवामान विभागाने शेतकर्यांना पुढील पिक नियोजनात काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. जमिनीतील मातीची तपासणी करूनच रब्बी हंगामातील पिकांची निवड करावी, तसेच रोगप्रतिरोधक जातींचा वापर करावा,“ असे आवाहन करण्यात आले आहे.