

पालघर ः पालघर जिल्ह्यातील किरकोळ दारू विक्रीच्या दुकानांमधील दारूचा पुरवठा गुजरात राज्यात केला जात असल्याचे गुजरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. वाईन शॉप मधील कर्मचाऱ्यां विरोधात वर्षभरात तीन कारवाया तसेच नियमभंग करून दारू विक्री सुरु असताना जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून वाईन शॉप विरोधात कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पालघर पूर्वेकडील प्रसिद्ध उद्योजकाच्या भागीदारीत असलेल्या महामार्गावरील वर्ल्ड वाईन शॉप मधील मॅनेजरला गुजरात राज्यातील भावनगर जिल्यातील भरतपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये नियमबाह्य पद्धतीने दारू पुरवठा केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात वाईन शॉपमधील मॅनेजरचे नाव समोर आल्याने अटकेची कारवाई करण्यात आली होती. वर्ल्ड वाईन शॉप मधून नियमबाह्य पद्धतीने गुजरात राज्यात दारू वाहतुकीच्या गुन्ह्यात सहभाग प्रकरणी महिनाभरात गुजरात पोलिसांकडून दुसरी कारवाई करण्यात आली आहे.
गुजरात राज्यात शंभर टक्के दारूबंदी लागू असताना महाराष्ट्र राज्यातुन गुजरात राज्यात बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या तस्करांची संख्या मोठी आहे. दारू तस्करी विरोधात गुजरात पोलिसांकडून कारवायांच्या संखेत वाढ झाली आहे. वर्षभरात पालघर जिल्ह्यातुन गुजरात राज्यात बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी गुजरात पोलिसांनी केलेली तिसरी कारवाई आहे. किरकोळ विक्रीचा परवाना असलेल्या वाईन शॉप मधून घाऊक पद्धतीने दारू विक्री केली जात असताना जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील भरतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर्शन भरतभाई जोशी यांच्या विरोधात 17 जुलै रोजी अवैध दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन केलेल्या तपासात मस्तान नाका येथील समुद्र वाईन शॉप मध्ये काम करणाऱ्या रुपेश पाटील याच्या मार्फत दारूसाठा खरेदी केल्याचे आढळून आले होते.गुजरात पोलिसांनी रविवारी दुपारी वर्ल्ड वाईन शॉप मधून रुपेश पाटील याला ताब्यात घेतले.
गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील चोटीला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजकोट अहमदाबाद महामार्गावर 21 सप्टेंबर रोजी रात्री जॉली एन्जॉय हॉटेलजवळ गस्तीवरील पोलिसांनी (364570) थांबवलेल्या ट्रकमध्ये मध्ये दारूसाठा आढळून आला होता.गुजरात राज्यात संपूर्ण दारूबंदी असताना बेकायदेशीर दारू वाहतूक करताना आढळून आल्याने तीन लाख 71520 किमतीचा दारू साठा आणि ट्रक मिळून तेरा लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
दारूबंदी अधिनियमा अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी ट्रक चालक अबजाल मेहबुबुभाई हाला याच्या चौकशीत महाराष्ट्र राज्यातुन गुजरात राज्यात दारूसाठा पाठवणारा आरोपी मस्तान नाका येथील वर्ल्ड वाईनचा कर्मचारी असल्यामुळे त्याला गुजरात पोलिसाकडून अटक करण्यात आली आहे.सहा दिवसांनी त्याची जमिनावर सुटका करण्यात आली होती.
बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी गुजरात पोलिसांची महिना भरात दुसरी कारवाई आहे. गेल्या वर्षी वाईन शॉपच्या मॅनेजर विरोधात नियमबाह्य दारू विक्री प्रकरणात वलसाड पोलिसांनी कारवाई केली होती. दरम्यान वाईन शॉप मधील कर्मचाऱ्यांचा बळी देऊन उद्योजक कारवाईपासून नामनिराळा राहत असल्याचे समोर आले आहे.दरम्यान या प्रकरणांकडे गांर्भीयाने लक्ष देण्याची आवश्यकता असून योग्य कारवाई अपेक्षित आहे.
वर्ल्ड वाईन शॉप मधील कर्मचाऱ्यांवर गुजरात पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत अधिकृत माहिती जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल.
गणेश बारगजे, अधीक्षक,उत्पादन शुल्क विभाग, पालघर.