

दीपक गायकवाड
खोडाळा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बोरशेती गावात गॅस्ट्रोच्या साथीचा मोठा उद्रेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावात शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक नागरिकांना जुलाबाचा त्रास सुरू झाला. हा आकडा झपाट्याने वाढून २० रुग्णांपर्यंत पोहोचला आहे. तातडीने या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून, उपचारादरम्यान दोघांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
सुरुवातीला काही रुग्णांवर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते, तर नीतू शाम झुगरे (१७) आणि करण रामदास शिद (१४) या दोघांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती स्थिर न झाल्याने, पुढील अधिक उपचारांसाठी त्यांना तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, काही रुग्णांनी त्यांच्या वैयक्तिक विनंतीनुसार खाजगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले आहे, तर ६ रुग्णांना आवश्यक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तातडीने कामाला लागले आहे. बोरशेती गावात रात्रीपासूनच खबरदारीची उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. डॉ. भाऊसाहेब चत्तर, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, मोखाडा यांनी माहिती दिली की, बोरशेती येथे रात्रीच जलशुद्धीकरण करण्याची तातडीची तजवीज करण्यात आली आहे. तसेच, दूषित पाण्याचा आणि शौचालयाचे (संडास) नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. गॅस्ट्रोचा शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतरही पुढील आठवडाभर आरोग्य कर्मचारी या भागात अधिक खबरदारीचा उपाय म्हणून देखरेख ठेवणार आहेत.
एकीकडे गावकरी साथीच्या आजाराने त्रस्त असताना, बोरशेतीमध्ये मात्र नेहमीप्रमाणेच राजकीय 'पोळी' भाजून घेण्याचा प्रयत्न दिसून आला. ऐनवेळी घटनेची माहिती मिळाल्यावर, एका स्थानिक नेत्याने तातडीने घटनास्थळी जाऊन रुग्णांसोबत फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट करून 'श्रेय्य' घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे श्रेय्यवादाला तोंड फुटले आणि सोशल मिडियावर हा राजकीय कलगीतुरा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने, संधीचं सोनं करून 'मीच कसा मोठा' हे दाखवण्याचा हा दुबळा प्रयत्न जनता आता सुज्ञपणे ओळखू लागली आहे.