पालघर : यंदाच्या आर्थिक वर्षात अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देताना विक्रमगड विधानसभा क्षेत्रात २२ कोटी ३५ लाख रुपयांपैकी तब्बल ५९ टक्के निधी देण्यात आला आहे. त्यामुळे विक्रमगड विधानसभा क्षेत्रालाच सर्वाधिक निधी प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामविकास विभागाने १९ ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून यंदाच्या बाधित कामांना ३०५४- २९११ लेखाशीर्षकाअंतर्गत मंजुरी दिली. पालघर जिल्ह्यातील सहा तालुक्यांना २२ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी विक्रमगड, मोखाडा व जव्हार तालुक्याला तब्बल १३ कोटी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत.
मंजूर करण्यात आलेली ही कामे इतर योजनेतून मंजूर नसल्याची - खातरजमा जिल्हा परिषदेच्या - कार्यकारी अभियंता यांनी करावयाची आहेत. हा निधी दुसऱ्या कोणत्याही - कामावर खर्च करण्यात येऊ नये अशी - अट आहे. अतिवृष्टी व पुरहानी - कार्यक्रमांतर्गत विक्रमगड तालुक्याला सर्वाधिक सहा कोटी रुपये, मोखाडा तालुक्याला साडेचार कोटी रुपये, जव्हार तालुक्याला दोन कोटी ६५ लाख रुपये, डहाणू तालुक्याला पाच कोटी पाच लाख रुपये, पालघर तालुक्याला तीन कोटी ५० लाख रुपये तर तलासरी तालुक्याला ६५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
यापूर्वी विविध लेखा शीर्षकांतर्गत कामे करण्यात आली होती. आता अनेक कामना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे खर्च झालेल्या रस्त्यांवर पुन्हा खर्च होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळच्या कामांना आता निधी मिळाला असून आणखीन निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. झालेल्या कामांवर पुन्हा कामे होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे जिल्हा परिषदचे बांधकाम खात्याने म्हटले आहे.