

वाडा : वाडा तालुक्यात सर्वत्र पिवळे सोने तयार झाले असून भातशेतीचे कामे जोमाने सुरू आहेत. मे महिन्यापासून पावसाची सुरू असलेली रिपरिप अखेर थांबली असून पावसाने माघार घेतल्याचे मानून शेतकरी कामाला लागला आहे. मजुरांचा तुटवडा ही दरवर्षीची बाब असली तरी मिळत त्या मजुरीला काम करून घेण्यासाठी शेतकरी तयार आहे. हळव्या व गरव्या शेतीवर आता विळी फिरवण्यास सुरुवात झाली असून यंत्राच्या साह्याने देखील कापणी उत्तम प्रकारे होत असल्याचे काही शेतकरी सांगतात.
वाडा तालुक्यात 14 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जात असून वाडा तालुक्याला भातशेतीचे कोठार मानले जाते. येथील वाडा कोलम तांदूळ जगात प्रसिद्ध असून हळवी व गरवी भातशेती येथे सध्या पिकून तयार आहे. पावसाने चांगली कृपादृष्टी केल्याने भातशेती उत्तम पिकली असून शेतकरी यावर्षी आनंदात आहे. परतीच्या पावसाने नुकसानी केली असली तरी मोठ्या प्रमाणावर शेती सुखरूप असल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसाची माघार जवळपास निश्चित झाल्याने शेतकरी कापणीच्या कामाला लागला असून वाडा तालुक्यात हळवी व गरव्या भातशेतीच्या कामाला वेग आला आहे. मजुरांचा तुटवडा ही समस्या कायम असून यावर्षी मजुरी 500 पार होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. दिवाळीचा सण तोंडावर आला असला तरी शेतकरी यावर्षी सण बाजूला सारून शेतीची कामे उरकून घेईल अशी शक्यता आहे. शेतात पाणी आहे मात्र पीक तयार असल्याने शेतकऱ्याची दमछाक होत आहे मात्र तरीही दिवाळीच्या आधी पीक खळ्यावर आणायचे यासाठी अनेक शेतकरी कामाला लागले आहेत.