

पालघर ः मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातिवली गावाच्या हद्दीतील निर्माणाधीन उड्डाणपुलामुळे होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यात यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पालघर जिल्हा दौर्यानंतर महामार्गावर निर्माण झालेली वाहतूक कोंडीची समस्या दहा दिवसांनी सुटली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग सुरक्षा पोलीस आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून महामार्गावरून वाहतूक कोंडी मुक्त प्रवास होत असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ठेकेदाराने काम सुरु केले होते.सातिवली उड्डाणपुलावर केलेल्या माती भरावावर खडी पसरण्यात आली, रोलरच्या साहाय्याने खडी प्रेस करून उड्डाणपुलावरून दोन हलक्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली.लागलीच उड्डाणपुलाच्या मुंबई वाहिनीवरील सर्व्हिस रोडच्या एका मार्गीकेचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु करून दोन दिवसात पूर्ण केले.आठवडा भरात काँक्रीटीकरण केलेल्या मार्गीकेवरून वाहतूक सुरु केली. त्यानंतर गुजरात वाहिनीवरील सर्व्हिस रोडच्या एका मार्गीके काँक्रीटीकरणाचे काम सुरु करून तीन दिवसात पूर्ण केले.बुधवारी गुजरात मार्गिकेवरील सर्व्हिस रोडची काँक्रीटीकरण केलेली मार्गीका वाहतूकीसाठी खुली करण्यात आली.
सातिवली उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवरील काँक्रीटीकरण केलेल्या दोन मार्गीका,उड्डाण पुलावरून सुरु असलेली वाहतूक तसेच वाहतूक पोलिसांचे नियोजन यामुळे वाहतूक कोंडी सुटली आहे.तीन ते चार दिवसांपासून वाहतूक कोंडी मुक्त प्रवास होत असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडच्या मार्गीकांचे काँक्रीटीकरणाच्या कामा दरम्यान महामार्ग सुरक्षा पोलीस, जिल्हा वाहतूक शाखा, ट्रॅफिक वार्डन आणि मनोर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी वाहतूक नियमन केले.
उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदाराकडून एक ग्रेडर मशीन,जेसीबी,रोलर आणि मोठ्या संखेने कामगार तैनात केले होते.दिवस आणि रात्र अश्या दोन पाळ्यांमध्ये कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील सातीवली गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे.जोरदार पाऊस आणि अवजड वाहनांमुळे सर्व्हिस रोडची खड्ड्यामुळे चाळण होऊन महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.सलग दहा दिवस महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर दहा ते पंधरा किलोमीटर लांबीच्या रांगा लागत होत्या. वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी साठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली होती.
विरार मारंबळपाडा ते टेम्बी खोडावे खरवाडेश्री जेट्टी,दहिसर बहाडोली- धुकटण रस्ता,पारगाव -सोनावे -दारशेत -सकवार रस्ता, चहाडे-तांदूळवाडी-पारगाव-वरई रस्ता आदी पर्यायी रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली होती.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे सातिवली उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण होत नसल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. उड्डाणपुल रखडल्यामुळे सलग दहा दिवस निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालक,रिक्षा चालक, प्रवासी,कंपन्यांमधील कामगार आणि स्थानिकांना बसला होता.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,महामार्ग सुरक्षा पोलीस, वाहतूक शाखेच्या संयुक्त प्रयत्नांनी वाहतूक कोंडी सोडवण्यात यश आले आहे.सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडचे काँक्रीटी करणाचा निर्णय घेऊन दोन्ही बाजूच्या एक एक मार्गीका काँक्रीटीकरण करण्यात आले आहे.वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी दक्षता घेतली जात आहे.
सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण