पालघर जिल्ह्यात टेक्स्टाईल इंडस्ट्री उभारणीच्या हालचाली

८८० एकर जमिनीची रिलायन्स समूहाकडून मागणी; जागा चाचपणी सुरू
Palghar News
पालघर जिल्ह्यात टेक्स्टाईल इंडस्ट्री उभारणीच्या हालचालीPudhari
Published on
Updated on

पालघर : पुढारी वृत्तसेवा

वाढवण बंदराच्या भूमिपूजनानंतर आता पालघरमध्ये मोठे उत्पादन उद्योग येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालघर तालुक्यातील माहीम व टोकराळे या भागात टेक्स्टाईल इंडस्ट्री उभारण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड या समूहाला वस्त्रोद्योग कारखान्यासाठी तब्बल ८८० एकर जमीन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रस्तावित टेक्स्टाईल उद्योगासाठी उपमुख्यमंत्री कार्यालयात ६ सप्टेंबर व ११ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय बैठक झाल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच भूसंपादनासाठी जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही या बैठकीदरम्यान देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीने पत्राद्वारे माहीम गावातील २२६.५५.४० हेक्टर आर व टोकराळे येथील १२५.५५ हेक्टर आर क्षेत्रफळाची जागा वाटप करण्याची विनंती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला केली होती.

लॉजिस्टिक म्हणजेच अवजड मालवाहतूक व्यवस्था करण्यासाठीही माहीम गावातील ४५.०५ हेक्टर जागा मिळण्याची विनंती ही केली गेली आहे. या इंडस्ट्रीला लागणारी जमीन सध्या महसूल विभागाची आहे. मात्र ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला थेट द्यावी, असा अर्ज मंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे २३ सप्टेंबर रोजी केला आहे. वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी देण्यात येणारी ही जमीन शासकीय दर किंवा अकृषीक दराने इंडस्ट्रीला देण्याबाबतचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. शासकीय जागा नाममात्र दराने देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे..

टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी लागणारी जमीन पास थ्रू पद्धतीने देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २३ सप्टेंबर रोजी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना पत्राद्वारे केली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीचा संदर्भ या पत्रामध्ये देण्यात आला आहे. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी १६ व २१ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या अर्जाचा संदर्भही यामध्ये नमूद आहे.

वस्रोद्योग प्रकल्प उभारणी आधी या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी माहीम खाडीवरील ३० मीटर रुंदीचा एक किलोमीटर लांबीचा केळवे रोड उड्डाणपूल, माहीम गावातील दक्षिण पश्चिम भागातील ३० मीटर रुंदीचा दीड किलोमीटर लांबीचा रस्ता, केळवे रोड येथील दीड किलोमीटर तर चिंत् पाडा येथील २.८ किलोमीटर लांबीचा प्रत्येकी २० मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी महामंडळाने सहकार्य करण्याची विनंती या प्रकल्पाचे प्रमुख वसंत पाटील यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.प्रस्तावित वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याची तरतूद करण्याची मागणीही रिलायन्स इंडस्ट्रीमार्फत करण्यात आली असून वांद्री धरण क्षेत्रातून १२ दलघमी व देवकोप बंधाऱ्यातून दोन दलघमी पाण्याची मागणी केली आहे. तसेच महामंडळाच्या कुर्जे धरणातून वर्षाला १३ दलघमी पाणी मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाकडून ३.५ दलघमी पाणी उपलब्ध करण्याचेही या पत्रात पाटील यांनी म्हटले आहे.

पालघर तालुक्यात दुग्ध

व्यवसाय विभागाकडे टोकराळे (केळवे रोड) येथील सर्वे नंबर ६, ८, १०, ११, १२अ, १३, १४, ३१, ३३ व ३४ मधील ११२ हेक्टर व माहीम गावातील सर्वे नंबर ८३५/१ (६३ हेक्टर) व ८३६ (१११ हेक्टर) या जागांसह लगतच्या भागातील शासकीय जागांमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे विचाराधीन आहे.

याच भागातील दीडशे ते २०० एकरच्या जवळपासची जमीन राष्ट्रहिताच्या विमान निर्मितीप्रकल्पासाठी देण्याचे विचाराधीन होते. तशी मागणीही करण्यात आली होती मात्र येथील जमीन वादातीत असल्याचे दाखवून या विमान निर्मिती प्रकल्पासाठी हे जमीन देण्याचे प्रकरण रेंगाळत ठेवले होते. मात्र आता औद्योगिक महामंडळाने तत्परतेने खासगी उद्योगाला जमीन देण्यासाठी अति वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

वस्त्रोद्योग प्रकल्प उभारणीच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयात एमआयडीसी,पाटबंधारे विभाग, वन विभाग, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होत असून या प्रत्येक विभागाने स्थळ पाहणीही केली आहे.

टेक्सटाईल उद्योगाच्या उभारणीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्याची शक्यता असली तरीही मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्मित होत असल्याने मासेमारीवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news