

दीपक गायकवाड,
मोखाडा : मोखाडा ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (22 ऑक्टोबर) नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रसूती दरम्यान केवळ एक परिचरिका उपलब्ध होती पण डॉक्टर हजर नसल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.. वैशाली बात्रे असे पीडित महिलेचे नाव असून ऐन दिवाळीत बाल मृत्यू घडल्याने कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे मुंबईपासून जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांवरील आरोग्य यंत्रणेची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे या महिलेला बुधवार रोजी सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. असह्य प्रसूती वेदना जाणवल्या नंतर महिलेची प्रसूती रात्री 10 वाजेच्या दरम्यान करण्यात आली. नवजात बालकाला दोन नाळ होत्या तसेच बाळाची प्रकृतीही चांगली नव्हती.
ही बाब खोडाळा येथील सोनोग्राफीमध्ये समोर आली होती. तथापी या ठिकाणी कोणतेही प्रसूतीतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामूळे कोणताही सल्ला मिळाला नाही व प्रसूतीत मोठी प्रतिक्षा करावी लागल्याने व तज्ज्ञांचा योग्य सल्ला मिळाला नसल्यामुळे सदर महिलेचे बाळ दगावले, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रसूतीनंतर बालक आणि सदर महिलेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही रुग्णालय प्रशासनाने केला आरोप आहे. 12 तासांत आरोग्य सुविधांचा अभाव आणि वैद्यकीय सल्ला न मिळाल्याने महिलेला ऐन दिवाळीत आपले बालक गमवावे लागले, असा आरोप आहे.
सदर महिलेच्या बाळाला तीन नाळ असणे अपेक्षित असते. तसेच वारही सुस्थितीत असावी लागते. अन्यथा प्रसूती दरम्यान बाळ दगावण्याची शक्यता दाट असते. तसेच बाळाची त्वचाही पिवळसर असल्याने बाळ दगावले आहे.
डॉ.भारतकुमार महाले, रुग्णालय अधिक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय
तथापी वैशालीचे पती अशोक यांनी वस्तुस्थिती विशद करताना सांगितले की,माझ्या पत्नीला बुधवारी सकाळी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. केवळ एका परिचारिकेच्या भरवशावर रुग्ण ठेवण्यात आले होते. दिवसभरात तिच्याकडे कोणी साधे ढुंकूनही पाहिले नाही. तिला वेळेतच वरिष्ठ रुग्णालयात पाठविण्यात आले असते तर आज माझे बाळ जीवंत असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.