

पालघर: हनिफ शेख
पालघर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील पालघर,डहाणू आणि जव्हार या नगर परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने या तीनही तालुक्यात सध्या उमेदवार शोधण्याची लगबग वाढली आहे. जव्हार नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला झाल्याने आजवर नगराध्यक्ष पदावर लढण्यासाठी इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांची निराशा झाली असली तरी हे आरक्षण जाहीर झाल्या नंतर सर्वच पक्षांनी आपली दावेदारी मजबूत करू शकू अशा महिला उमेदवाराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. तर मी नाही तर माझी पत्नी सही याप्रमाणे काहींनी घरातूनच महिला उमेदवार तयार केल्याचे देखील चित्र आहे.
सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत असली तरी जव्हार नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची शक्यता दुसर झाल्याचे सध्याचे चित्र आहे. कारण की भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदावर आमचाच उमेदवार लडेल अशी भूमिका घेतली आहे.मुळात जव्हार नगर परिषदेवर याआधी शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. त्या दृष्टीने शिवसेनेने दावा केलेला असला तरी गत पंचवार्षिक मध्ये एक नगरसेवक असलेल्या भाजपने मात्र यावेळी जव्हार शहरात आमची ताकद अधिक वाढल्याचे सांगत नगराध्यक्षपदावर दावा केला आहे.
यामुळे अशा परिस्थितीत महायुतीची शक्यता अधिकच दुसर होताना दिसत आहे मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेने राष्ट्रवादी अजित पवार गटाशी सलगी केल्याची माहिती आतल्या गोटातून मिळत आहे. यामुळे जर भाजपाने नगराध्यक्ष पदावर आपला दावा कायमच ठेवला तर भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी अजितदादा गटाशी हात मिळवणी करून लढण्याची तयारी शिवसेना शिंदे गट यांनी सुरू केल्याची सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळत आहे यामुळे जर नगराध्यक्ष पदावर एक मद न होता स्वतंत्र लढण्याचा नारा महायुतीतील प्रत्येक घटकांनी दिल्यास नगरसेवक पदासाठी सुद्धा युती होण्याची शक्यता अजिबातच नाही.
जवाहर नगरपरिषदेवर गेल्या तीन वर्षात पासून प्रशासकाने कारभार केलेला आहे. यामुळे कधी एकदाची निवडणूक लागते आणि आम्ही लढतो या तयारीत सर्वच पक्ष होते. प्रभाग रचना होऊन त्यातील आरक्षण जाहीर झाले यानंतर नगराध्यक्ष पदासाठी चे सुद्धा आरक्षण जाहीर झाल्यानंतर या राजकीय घडामोडींनी आता प्रचंड वेग घेतला आहे.
याबाबत भाजप,शिवसेना(शिंदे गट),राष्ट्रवादी (शप) यांच्या बैठका सुद्धा झाल्या असून महाविकास आघाडीची एकत्रित बैठक सुद्धा काही दिवसापूर्वीच पार पडली यामध्ये एकत्रित निवडणूक लढविण्यावर महाविकास आघाडीतील घटक सकारात्मक असल्याचे दिसले मात्र नगराध्यक्ष पदावरील उमेदवार चांगला चेहरा कोणाकडे आहे याचा शोध देखील महाविकास आघाडी कडून घेण्यात येत आहे. तर शिवसेना (शिंदे गट)कडून नगरसेवक पदावर उमेदवार देण्याबाबत तडजोड करण्यात येईल ही मात्र नगराध्यक्ष पदाबाबत अजिबात तडजोड करण्यात येणार नसल्याचे ठाम मत अंतर्गत बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .