

विक्रमगड : तालुक्यातील कुपोषण, माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा सुरळीत मिळायला हवी. आरोग्यसेवेसाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय, उपकेंद्र अशा विविध स्तरावरील आरोग्य यंत्रणा काम करत आहेत.
परंतु, या आरोग्य यंत्रणा तोकड्या पडत असल्याने नवीन उपकेंद्र व आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे. तालुक्यातील काही गावांचा उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आलेला आहे. परंतु, अजूनपर्यंत या आरोग्य सेवेला मंजुरी मिळालेली नाही.
विक्रमगड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत असतात. परंतु, सातत्याने प्रयोग करूनही जिल्ह्यातील आरोग्य समस्या निकाली निघालेली नाही. ग्रामीण भागात आरोग्याची दालने कमी असल्याने समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
या समस्या दूर करण्यासाठी तालुक्यासाठी नवीन मंजुरीसाठी पाठवलेली १६ उपकेंद्र असून, करसूड, मसरूळी, चापके तलावली, केव, बोराडे, सातखोर, वसुरी, साखरे, वेहलपाडा, केगवा अशी एकूण १६ मंजुरीसाठी पाठवलेली उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ही उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होणे अपेक्षित आहे.
विक्रमगड ग्रामीण रुग्णालयास शंभर खाटांचे मंजुरी मिळाली आहे. मात्र ते अद्यापही सुरू झालेले नाही, याकडेही आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. या भागातील आरोग्य केंद्रांच्या काही इमारती बांधून तयार झाल्या असतानाही कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या भागातील आरोग्य केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे या केंद्रांतील कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती होणे गरजेचे आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.