

पालघर : पालघर तालुक्यामधील ढवळे रुग्णालयाच्या मागे असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीकडून मनमानी कारभार करण्यात आला आहे. यश मल्टी प्रिंटपॅक असे या कंपनीचे नाव असून या कंपनीकडून कंपनीच्या खासगी कामासाठी सार्वजनिक वापराचा रस्ता मधोमध खोदून नुकसान केल्याचे समोर आले आहे.
पालघर नगरपरिषद हद्दीमध्ये सर्वे क्रमांक 130 मध्ये प्लॉट क्रमांक 16 व 17 वर ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये वह्या पुस्तके असे उत्पादन घेतले जात आहे. या कंपनीने लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करताना नगरपरिषदेची परवानगी न घेता थेट डांबरी रस्ता खोदला व त्यानंतर तो बुजवला.
नगरपरिषदेला या प्रकाराची कल्पनाच नव्हती. मात्र त्यांनाही बाब कळाल्यानंतर कंपनीचे मालक अनिरुद्ध असावा व इतर यांना 12 मार्च रोजी नगरपरिषदेने नोटीस बजावली व त्यानुसार नुकसान झालेली दंडाची नोटीस बजावली. मात्र त्या नोटीसीला कंपनीच्या मालकांनी दाद न दिल्यामुळे नगरपरिषदेने पुन्हा 4 जून रोजी 45 हजार 760 रुपये भरपाई करण्याची दुसरी नोटीस कंपनीला बजावली. त्यानंतरही कंपनी मालक या नोटिसीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
ढवळे रुग्णालय-विनायक इंडस्ट्री ते गार्डन बाईंडर कंपनी पर्यंतचा डांबरी रस्ता अलीकडेच नगरपरिषदेकडून नव्याने तयार करण्यात आला आहे. या रस्त्यात या कंपनीने विनापरवानगी खोदकाम करून या रस्त्याची पुरती वाट लावली. रस्ता दुरुस्त करण्याच्या नावाने खोदकाम केलेल्या खड्ड्यामध्ये पुन्हा तकलादू मलमपट्टी करून तो तसाच सोडून देण्यात आला.
आठ मीटरच्या जवळपास हा रस्ता कंपनीद्वारे खोदण्यात आला. त्यामुळे कंपनीला पाच हजार सातशे वीस रुपये प्रति मीटर याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. हा दंड सात दिवसाच्या आत नगरपरिषदेकडे जमा करावा अशी नोटीस वजा स्मरणपत्र नगर परिषदेच्या नगर अभियंतांनी कंपनीच्या मालकांना पाठवले आहे. नोटीस मिळून दहा ते बारा दिवस उलटून गेल्यानंतरही कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यापुढे कंपनीवर कारवाई केली जाईल असे नगरपरिषदेने म्हटले आहे.