

Boisar water supply issue
बोईसर : डी-मार्ट जवळील बोईसर-चिल्हार रस्त्यावर तारापूर एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी फुटल्याने शुक्रवारी (दि.१०) सकाळपासून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. सतत पाणी वाहत असल्यामुळे रस्त्यावर वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या लिकेजमुळे बोईसर–चिल्हार मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सकाळपासूनच पाणी मोठ्या वेगाने वाहत असल्याने अनेक दुचाकी चालकांचा समतोल बिघडला आहे. नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. एका बाजूला पाण्याची टंचाई तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, हे प्रशासनाचे दुर्लक्षच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया काही स्थानिकांनी दिली.
सदर लाईन तारापूर औद्योगिक क्षेत्राला (एमआयडीसी) पाणीपुरवठा करणारी प्रमुख लाईन असून, या लाईनमधील गळतीमुळे एमआयडीसीतील अनेक कंपन्यांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही उद्योगांना सकाळपासूनच पाण्याचा दाब कमी झाल्याचे जाणवत असल्याची माहिती मिळाली आहे.