पालघर; पुढारी वृत्तसेवा : पालघर आगारातील एका महिला वाहकाचा ड्युटीवरच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या मृत्यूने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली. प्रकृती बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
पालघर आगारातील एका महिला वाहकाला ड्युटी बजावत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सिल्वासा येथे हलविण्यात आले. परंतु रुग्णवाहिकेतून नेत असतानाच वाटेतच त्यांचे निधन झाले. सोमवारी (दि. २१) सकाळी ही घटना घडली. मंदा गुरुनाथ काळे असे या अविवाहित महिलेचे नाव असून त्या वाडा तालुक्यातील सापने या गावच्या रहिवासी आहेत.
रविवारी (दि. २०) सकाळी नेहमीप्रमाणे पालघर ते सातपाटी अशा दोन फेऱ्या मारल्यानंतर त्यांना पालघर ते कल्याण अशी ड्युटी करायची होती. तत्पूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने विश्रामगृहात त्यांनी थोडासा आराम केला. मात्र, त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने मनोर येथे हलवण्यात आले. तिथेही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना सिल्वासा येथे हलवण्याचा सल्ला दिला. सिल्वासा येथे जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या सहकारी मैत्रिणीच्या निधनाचे वृत्त समजताच तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला वाहकांनी आपले कर्तव्य बाजूला ठेवून घटनास्थळी धाव घेतली आहे.