पालघर : महावितरण कंपनीचा अधिक्षक अभियंता लाचलूचपतच्या जाळ्यात | पुढारी

पालघर : महावितरण कंपनीचा अधिक्षक अभियंता लाचलूचपतच्या जाळ्यात

पालघर, पुढारी वृत्तसेवा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पालघरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात महावितरण कंपनीच्या पालघरच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. संबंधित अभियंत्यांनी तक्रारदार व्यक्तीच्या वीज वापरात अनियमितता असल्याने कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांची लाच मागणी केली होती. तडजोडी नंतर एक लाख रुपये स्वीकारताना कार्यकारी अभियंता प्रताप मचिये आणि अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांना रंगेहाथ पकडले. यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या वीज वापरात अनियमितता असल्याच्या तक्रारी महावितरण कंपनीच्या पालघरच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कारवाई टाळण्यासाठी किरण नागावकर यांना दोन लाख रुपये द्यावे लागतील, असा निरोप महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांनी तक्रारदाराला दिला होता. यानंतर महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडून लाचेची मागणी केली जात असल्याची तक्रार पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता प्रताप मचिये यांनी तक्रारदारासोबत तडजोडी करुन दीड लाख रुपयांची मागणी केली आणि किरण नागावकर यांनी सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचेचा सापळा रचण्यात आला होता.

सोमवारी (दि.२६) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दीड लाख रुपयांपैकी एक लाख रुपये रकमेचा पहिला हप्ता प्रताप मचिये यांना स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचेची मागणी आणि लाचेची रक्कम स्वीकारण्यात किरण नागावकर यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने किरण नागावकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक नवनाथ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button