पालघर : पाच वर्षीय अपहृत मुलीची 2 तासांत सुटका | पुढारी

पालघर : पाच वर्षीय अपहृत मुलीची 2 तासांत सुटका

पालघर; मंगेश तावडे : पालघरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणकर्त्याचा छडा लावण्यात पालघर पोलिसांना बुधवारी सायंकाळी यश आले. सुमारे सहा तासांच्या घटनाक्रमानंतर मुलीला पाहून तिच्या नातेवाईकांचा जीव
भांड्यात पडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे, पोलीस नाईक रमेश
पालवे, भगवान आव्हाड, सागर राउत, कल्पेश पाटील यांनी आपला हिसका दाखवून अपहरणकर्त्या सनी कांबळे
याला केळवे रोड रेल्वे स्टेशनवर सायंकाळी 6.45 च्या दरम्यान ताब्यात घेतले.

अपहरण झाल्याची घटना दुपारी 3.30 च्या दरम्याने पालघर वर्धमान सृष्टी येथे घडली. जगताप कुटुंबिय पालघरमध्ये
गेली अनेक वर्षे राहत असून अपहरणकर्ता त्यांच्या नात्यातील आहे. दौंड येथून आलेला हा सनी गेले आठ महिने तो पालघरच्या एका कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे. दुपारी 3.30 च्या दरम्यान सनी कांबळे याने या चिमुकलीला फिरायला नेतो असे सांगून घेवून गेला. तत्पूर्वी त्याने त्यांच्याकडून 500 रुपयांची मागणी केली तीही पूर्ण करण्यात आली. काही तासांनंतर या चिमुकलीच्या वडिलांना त्याने फोन करून मला 1 लाख रुपये तत्काळ पाठवा, तुमच्या
मुलीचे मी अपहरण केले आहे. हे शब्द ऐकल्यावर सुरत येथे कामाला असणारे बापू जगतात यांच्या पायाखालची
वाळूच सरकली. त्यांनी लागलीच पत्नी आणि अन्य नातेवाईकांना फोन करून ही घटना सांगितल्यानंतर तिच्या आईने हंबरडाच फोडला.

सनी कांबळे असे या युवकाचे नाव असून तो सुद्धा विष्णूनगर येथील वर्धमान सृष्टी येथे दुसर्या सदनिकेत राहतो. नात्यातील युवक असल्याने इतर नातेवाईकांनीही तसे मनावर घेतले नाही. तो गंमत करीत असेल असा
समज करून घेतला होता. मात्र, या घटनेतील गांभीर्य वाढत असल्याचे समजताच जगताप कुुटुंबियांनी पालघर
पोलीस ठाणे गाठले.पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून काढले तर तो उसरणी येथे असल्याचे समजले. तसेच तो
तिच्या वडिलांशीही फोनवर बोलायला देत असे. तिने त्याला विचारले की दादा आपण कुठे जातो आहोत. तर केळवे समुद्रकिनार्यावर तुला नेतो,चॉकलेट देतो, फिरवून आणतो असे सांगून तिची समजूत काढत होता आणि तिच्या वडिलांकडे पैशांची मागणी करीत होता. वडिलांनी त्याला सर्वप्रथम 2 हजार रुपये गुगल पे केले आणि तू मागशील तेवढे पैसे देतो, असे सांगून बोलण्यात गुंग ठेवले.

Back to top button