वादळी समुद्रात सापडलेल्या 21 बोटी उत्तन किनारी सुखरूप परतल्या | पुढारी

वादळी समुद्रात सापडलेल्या 21 बोटी उत्तन किनारी सुखरूप परतल्या

भाईंदर : राजू काळे उत्तन, चौक, पाली येथील 21 मासेमारी बोटींसह वसई येथील काही बोटी शनिवारी सकाळच्या सुमारास मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाल्या. या बोटी समुद्रात अचानक उठलेल्या वादळात सापडल्यानंतर उत्तनच्या 21 बोटी 10 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत किनार्‍यावर सुखरूप पोहोचल्या, तर वसईच्या दोन बोटींनी गुरातमधील जाफराबाद बंदरात आश्रय घेतल्याने त्या बोटींसह त्यातील मच्छीमारांचे जीव वाचल्याची घटना समोर आली.

6 ऑगस्टला समुद्र नेहमीप्रमाणे शांत असल्याने उत्तन, चौक व पाली बंदरातील 21 बोटी त्यातील तांडेल, मच्छीमार व खलाशांसोबत पहाटेच्या सुमारास मासेमारीसाठी रवाना झाल्या. मासेमारीच्या प्रवासात मच्छीमारांचा आपापल्या कुटुंबासोबत सतत संपर्क सुरू होता. बोटी खोल समुद्रात मासेमारी करीत असताना अचानक वादळ सुरू झाले. वादळ व जोराच्या वार्‍यासोबत लाटांचा जबरदस्त तुफानी मारा सुरू झाल्याने बोटी जोरजोरात हेलकावे खाऊ लागल्या. वार्‍याचा वेग वाढल्यानंतर बोटी व त्यातील मच्छीमारांचा संपर्क तुटला. यामुळे भयभीत झालेल्या मच्छीमारांच्या कुटुंबांनी पाली-उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बर्नड डिमेलो यांच्याकडे धाव घेत मासेमारीसाठी गेलेल्या 21 बोटींचा संपर्कच होत नसल्याचे त्यांना सांगितले. बर्नड यांनी उत्तनमधील इतर मच्छीमार सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांना बोलवून घेतले. यावेळी सर्वचजण चिंताग्रस्त होऊन ज्यालात्याला आपल्या कुटुंबातील मच्छीमार सदस्यांची चिंता वाटू लागली.

बर्नड यांनी समुद्रात किती बोटी आहेत याची माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी उत्तन मच्छीमार सहकारी संस्थेच्या 5, पाली-उत्तन मच्छीमार सोसायटीची 1 व डोंगरी-चौक सोसायटीच्या 15 अशा एकूण 21 बोटी वादळात सापडल्याची माहिती मिळाली. ती माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांना पाठवल्यानंतर तांडेल यांनी ती माहिती मासेमारी बोटींचे परवाना अधिकारी नंदकुमार पाटील यांना पाठवून वादळात सापडलेल्या बोटींचा संपर्क होत नसल्याचे त्यांना सांगितले. तसेच त्यांनी त्या बोटींची माहिती ईमेल व व्हॉट्सप द्वारे सर्व शासकीय यंत्रणांना कळविली. घटनेची गंभीर दखल घेत मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांनी पालघर व ठाणे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांना कळवून तात्काळ माहिती दिली होती.

अखेर मच्छीमारांनी घेतला सुटकेचा नि:श्‍वास

समुद्रातील वादळाचा तडाखा जसा वाढत होता तशी उत्तन, पाली, चौक किनार्‍यावरील मच्छीमारांच्या हृदयांची धडधड वाढत होती. किनार्‍यावरील मच्छीमारांचे डोळे बोटींकडे लागले असतानाच बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उत्तन येथील जलधन बोटीचा संपर्क झाला. यामुळे किनार्‍यावरील मच्छीमारांना काहीसा दिलासा मिळाला. जलधन बोटीवरील मच्छीमारांनी समुद्रातील वादळाची तीव्रता वाढल्याने आम्ही किनार्‍यावर परतत असून सायंकाळपर्यंत पोहोचू, असा निरोप दिला. ही बोट त्यातील मच्छीमारांसह दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास किनार्‍यावर सुखरूप पोहोचली. तर उर्वरीत बोटींचा शोध कोस्ट गार्डचे संकल्प नावाचे जहाज उत्तन बंदराच्या सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील समुद्रात घेत असताना जहाजावरील जवानांना सुमारे 11 ते 12 बोटी उत्तनच्या दिशेने येत असल्याचे निदर्शनास आले. त्या बोटींना सुखरूप बंदरावर नेण्यात आल्यानंतर उत्तन, पाली व चौक मधील सर्व 21 बोटी रात्री 11 वाजेपर्यंत सुखरूप किनार्‍यावर पोहोचल्या आणि मच्छिमारांनी सुटकेचा नि:श्‍वास घेतला

हेही वाचा

Back to top button