भिवंडीत एक्सपायरी मालावर कारवाई करण्यास सुरुवात | पुढारी

भिवंडीत एक्सपायरी मालावर कारवाई करण्यास सुरुवात

भिवंडी : संजय भोईर :  दैनिक पुढारीमध्ये 28 जून रोजी भिवंडी बनले एक्सपायरी उत्पादनाचे विक्री केंद्र या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या बातमीची दखल अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने घेत मागील तीन दिवसांपासून अन्न निरीक्षकांचे दंडात्मक कारवाई करीत भिवंडीत अशा दुकानांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांना टाळे लावून पळ काढला आहे. तर काहींवर कारवाईचा बडगा उचलला गेला आहे.

अन्न निरीक्षक माणिक जाधव व रामलिंग बोडके यांनी मागील तीन दिवसांपासून शहरात अशा दुकानांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गैबिनगर औलिया मस्जिद येथील एका गाळ्यात ताज बाजार नावाचे दुकन सुरू असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी पाहणी केली असता तेथे प्रभात दूधचे फ्लेवर मिल्क, भिकाजी फ्लेवर चिप्स, तूर डाळ, रिफाईंड तेल असे 11 खाद्य व जीवनावश्यक पदार्थ मुदतबाह्य होऊन ही विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने दुकान मालक पिरमोहम्मद अब्दुल सत्तार खान यांना मुदतबाह्य झालेला माल बाजूला काढून सीलबंद करून ठेवण्याचे आदेश देत त्या विरोधात अन्न सुरक्षा मानक अधिनियमातील तरतुदी नुसार 25 हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भिवंडीत एक्सपायरी मालाची विक्री करणार्‍या दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून पळ काढला आहे. परंतु अशा दुकानदारांवर पालिका आरोग्य विभागाने ही कारवाई करण्याची गरज असून ती केली जात नाही या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button