मुलांच्या नावापुढे वडिलांसोबत आईचेही नाव लावा | पुढारी

मुलांच्या नावापुढे वडिलांसोबत आईचेही नाव लावा

अंबाडी : पुढारी वृत्तसेवा :  मुलांच्या जन्माच्या 9 महिन्यापासून ते पालन पोषण, शिक्षण जडणघडण इत्यादीत सर्वात मोलाचे योगदान, त्याग हा आईचा. मग आईचे नाव सगळीकडे आपल्या नावासमोर क नको? हाच प्रश्न घेऊन आता श्रमजीवी संघटनेने विशेष मोहीम सुरू केली आहे. आईच्या नावाचा उल्लेख असावा असा विचार सर्वप्रथम श्रमजीवी संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी मांडला म्हणूच जुलै महिना हा या विशेष मोहिमेसाठी राखीव ठेवत श्रमजीवी संघटनेने याबाबत ग्रामपंचायतींचे ठराव घेण्याची मागणी केली.

याच श्रमजीवीच्या आवाहनाला मागणीला प्रतिसाद देत राज्यातील पहिलाच ठराव हा शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पालसई या ग्रामपंचायतीने घेतला असून तसे पत्र ठरावाचा संदर्भ देत त्यांनी जिल्हाधिकारी पालघर यांना दिले आहे. एका आवश्यक आणि ऐतिहासिक परिवर्तनाची सुरुवात होत असताना पालघर जिल्ह्यातील पालसई ग्रामपंचायतीने केलेला हा ठराव म्हणचे या मोहिमेचा मैलाचा दगड मानला जाईल हे निश्चित.

आईशिवाय कोणाचेही आयुष्य हे अंधारमयच आहे हे जरी सत्य असले तरी आपल्या नावापुढे मात्र फक्त वडिलांचेच नाव लावण्याची, सांगण्याची प्रथा पडली आहे. गेली अनेक वर्षे श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित यांनी याबाबत नेहमीच आग्रही भूमिका घेत नावासमोर वडिलांसोबत आईचेही नाव लावण्यासाठी जनजागृती केली.

किंबहुना संघटनेच्या कुटुंबात हे अंगवळणी पडलं देखील मात्र समाजात अजूनही नावापुढे आईचे नाव जाणीवपूर्वक लावण्यासाठी सगळेच पुढे येतात असे दिसत नाही. याबाबत आता श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित – संस्थापक विवेक पंडित यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची कन्या आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. स्नेहा दुबे-पंडित यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू असून, जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याही याबाबत भेटी घेऊन मागणी केलेली आहे.

स्त्री सबलीकरणासाठी आणखी एक पाऊल

वाडा तालुक्यातील ग्रामपंचायत पालसई येथील ग्रामसभा दि. 31/05/2022 ठराव क्र . 5 ( 3 ) अन्वये आजच्या विज्ञानाच्या युगात स्त्री पुरुष समानता, नारी शक्ती, स्त्री सबलीकरण, तसेच सन 2022 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत वर्ष म्हणून साजरे करत आहोत. या वर्षामध्ये भारतातल्या प्रत्येक मातेला तिचा समानतेचा अधिकार मिळावा

यासाठी त्या मातेने जन्म दिलेल्या तीच्या बाळाच्या नावाच्या पुढे वडिलांसोबत मातेचे नाव सुद्धा बाळाच्या जन्म दाखल्या मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात तसेच या संदर्भात सर्व शासकीय व खासगी आस्थापनावर दस्तऐवजांवर जिथे कोणत्याही व्यक्तीचे नाव लिहिण्याची सक्ती असते तिथे बाळाचे नाव, मधले नाव, आडनाव असे तीनच रकाने न भरता बाळाचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव असे चार रकाने भरावेत व ते सक्तीचे करून सर्व मातांना त्यांचा समानतेचा अधिकार देण्यात यावा असा ठराव ग्रामसभेने पारित केला.

Back to top button