गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या बांधवांना एसटीचा दिलासा; प्रवासासाठीचे आरक्षण सुरू | पुढारी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या बांधवांना एसटीचा दिलासा; प्रवासासाठीचे आरक्षण सुरू

खानिवडे : पुढारी वृत्तसेवा :  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळा तर्फे विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जवळपास 325 गाड्या सोडण्याचे नियोजन पालघर एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून प्रवासासाठीचे आरक्षण सुरू केले आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात महत्वाचा सण समजला जातो. कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असल्याने वसई, विरार मधून दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी गावी जातात. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यावर्षी 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यासाठी पालघर एसटी महामंडळानेही विशेष गाड्या सोडण्याच्या संदर्भात नियोजन सुरू केले आहे.

25 ऑगस्ट पासून गाड्यांचा प्रवास सुरू होणार

यात वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून 325 गाड्या सोडण्यात येणार आहेत. यातील 200 गाड्या या सामूहिक आरक्षणासाठी तर इतर आरक्षणासाठी 125 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी 25 ऑगस्ट पासून गाड्यांचा प्रवास सुरु करण्यात येणार आहे. आठवडा भरापासून आरक्षण सुरू झाले आहे. सध्या 325 गाड्यांचे नियोजन करून ठेवले आहे. जशा गाड्या आरक्षित होतील त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल असे पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे.

Back to top button