पालघरात कट्ट्यासह 6 काडतुसे जप्त | पुढारी

पालघरात कट्ट्यासह 6 काडतुसे जप्त

पालघर : बाबासाहेब गुंजाळ :  पालघर शहरात सध्या गुन्हेगारी कारवाया वाढीस लागल्या असून गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. शहरात अनेक अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. गेल्या काही काळात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे शहरात घडले आहेत. त्यात गोळीबारासारख्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. दरम्यान शहरात अवैध गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा सहा जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली. मात्र हे शस्त्र आरोपी कुणाला विकण्यासाठी आला होता? याचा तपास पोलीस करीत आहेत.

पालघर स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक अजय वसावे, उपनिरीक्षक सागर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश वाघ यांना त्यांच्या खबर्‍याकडून 26 जून रोजी काहीजण गावठी कट्टा विकण्यासाठी पालघर शहरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पोलीस हवालदार मुदतसर दांडेकर, हिरामण खोटरे, कपिल नेमाडे तर पोलीस नायक हेमंत भागरे, मनोज राऊत, किरण देवरे यांनी सापळा रचला असता दोन संशयित आरोपींना त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेतले असता, झाडाझडतीत त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतूसे असे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता पालघर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पालघर शहरात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यापैकी एका घटनेत झालेला गोळीबार हा बनावट देशी कट्ट्यातूनच झाला असल्याची उकल झाली होती. मात्र एका पत्रकारावरती झालेला हल्ला उकलण्यात पालघर पोलिसांना अजून यश आले नाही. आता याच पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा पालघर शहरात आरोपी कायद्याची भीती नसल्यानेच जणू बिनधास्त विक्रीसाठी आले, त्यांना नक्की कोणी बोलावले? हे मात्र शोधण्याचे आव्हान पालघर पोलिसांपुढे आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र 192/2022 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,25(1) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना आम्ही अशा कुठल्याही घटना खपवून न घेता याचा कसोशीने तपास करून हे गावठी कट्टे कुठून आले आणि कोणी मागवले याचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. नागरिकाकडून कुठे जरा जर काही संशयित हालचाली आढळून आल्यास त्यांनी थेट पालघर
पोलीस अधीक्षक कार्यालयाला संपर्क करावा असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे अथवा गुन्हेगारी कृत्य
खपवून घेतले जाणार नाही असे दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पालघर शहरामध्ये जुगार राजरोसपणे खेळला जातो. गांधीनगरमध्ये अमली पदार्थ विक्री तसेच शहरभर पान टपरींवर गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये नशेचे वाढते प्रमाण बघता त्यांना अमली पदार्थ सहज कसे उपलब्ध होतात? पालघर शहर पोलीस ठाण्याचा या गुन्हेगारांवरती वचक राहिला नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. पोलीस प्रशासनाने मात्र गुन्हेगारांचा छडा लावण्याचे आमचे प्रयत्न सुरुच राहतील असे सांगितले.

Back to top button