सर्वात मोठ्या फुटीने महाराष्ट्र हादरला... | पुढारी

सर्वात मोठ्या फुटीने महाराष्ट्र हादरला...

कोकण डायरी; शशी सावंत : शिवसेनेचे ताकतवान नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या फुटीमुळे राज्यातील आघाडी सरकारही अल्पमताच्या उंबरठ्यावर उभे आहे. या फुटीचे पुढे काय होणार? याकडे एकाबाजूला सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसर्‍या बाजूला शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. हा संघर्ष कुठच्या वळणावर जाणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेनेतील ही पहिली फूट नाही. शिवसेनेने यापूर्वी अनेक फुटींचा सामना केला आहे. याचाच हा घेतलेला मागोवा…

शिवसेनेमध्ये आमदार फुटीची घटना नवीन नाही, छगन भुजबळ ते एकनाथ शिंदे हा क्रम पाहिला तर जवळपास चार मोठ्या नेत्यांच्या बंडाने हा पक्ष 1990 ते 2022 अशा 32 वर्षांत पुढे गेला आहे. नेमकी बंड कशी झाली? याचा मागोवा घेतला तरीही शिवसेना महाराष्ट्रात आपले स्थान ठेवून आहे हे लक्षात येते. मात्र, आजच्या या सर्वांत मोठ्या फुटीमुळे अखंड महाराष्ट्र ढवळून गेला आहे.

शिवसेनेने ज्या मोठ्या बंडांचा सामना केला. त्यातले पहिले बंड होते 1991 ला छगन भुजबळ यांचे. त्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे अशी ही बंडाची मालिका आहे. यामध्ये राज ठाकरे हे तर घरातलेच सदस्य होते. सर्वात पहिली मोठी बंडखोरी झाली ती 1991 मध्ये, त्यावेळी खलनायक होते छगन भुजबळ आणि त्यांना फूस लावणारे होते दस्तूरखुद्द शरद पवार. एकूण 52 पैकी 17 आमदार त्यावेळी फुटले होते. घटना होती नागपूरची. त्यावेळी पक्षांतरबंदीचा कायदा एवढा कडक नव्हता. आताच्या तरतुदीही तेव्हा नव्हत्या, त्यामुळे त्यांची आमदारकी वाचली होती. या बंडाची पार्श्‍वभूमी 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीची होती. त्यावेळी शिवसेना- भाजप युती झाली होती. शिवसेनेने 183 जागा लढवून 52 जिंकल्या, तर भाजपने 104 जागा लढवून 42 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद दिले आणि वादाची ठिणगी पडली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे असलेले सेना नेते छगन भुजबळ यांनी मनोहर जोशींविरुद्ध बंड करत 17 आमदारांना आपल्यासोबत घेऊन बंडखोरी केली. ही बंडखोरी बाळासाहेबांच्या जिव्हारी लागली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी भुजबळांचा ठाकरी शैलीत चांगला समाचार घेतला होता. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ 17 आमदारांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि उपमुख्यमंत्रीही झाले. आता काँग्रेस अधिक मजबूत झाली असे त्यावेळी सर्वांना वाटले. पण हे खरे ठरले नाही. नंतर लगेचच झालेल्या 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला तब्बल 73 जागा तर भाजपला 65 जागा मिळाल्या आणि युतीचे राज्य महाराष्ट्रात पहिल्यांदा आले. म्हणजे मोठ्या फुटीनंतरही शिवसेनेने मोठी बाजी मारली आणि आपला महाराष्ट्रातील दबदबा निर्माण केला.

ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या न्यायाने मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. छगन भुजबळांच्या बंडाची किंमत त्यांना द्यावी लागली. काँग्रेसची सत्ता गेली. भुजबळांचीही मोठी पंचाईत झाली. पाच वर्षे सेना-भाजप युतीचे सरकार पूर्ण काळ चालले. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा देशभर डंका होता. या काळात शेवटचे नऊ महिने शिवसेनेचे तरुण नेते नारायण राणे मुख्यमंत्री झाले. अनेक धडाकेबाज निर्णय त्यांनी घेतले. लोकसभेबरोबर निवडणूक घेवून पुन्हा सत्तेत यायचं या हिशोबाने सहा महिन्याआधीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली. मात्र युतीला बहुमत मिळाले नाही. खरतर या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली होती. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करत 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि काँग्रेसला दणका दिला होता. काँग्रेसची दोन शकले झाली, त्यावेळी युती बहुमताने येईल असे अंदाज होते मात्र तेही फोल ठरले याचे कारण शिवसेना-भाजप युतीला अंतर्गत कलहाचे ग्रहण लागले होते.

नारायण राणे विद्यमान मुख्यमंत्री होते, तर उपमुख्यमंत्री असलेल्या भाजपच्या गोपीनाथ मुंडे या दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचे होते. यामध्ये अधिक जागा जिंकण्याची आणि दुसर्‍याच्या पाडण्याची रस्सीखेच सुरू झाली. यात युतीचे नुकसान झाले. युतीला केवळ 125 जागा मिळाल्या. त्यात शिवसेना 69 तर भाजप 56 वर होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले. तरीही त्यांना चांगल्या जागा मिळाल्या होत्या. अखेर शरद पवारांनी सत्तेचा गेम फिरवला आणि काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून आघाडीची सत्ता आणली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. तर नारायण राणे यावेळी विरोधी पक्षनेते झाले. हे सरकार पाच वर्षे चांगले चालले. सत्ता गेल्याने युतीमध्ये अस्वस्थता होती. यानंतरची निवडणूक जिंकायची असे ठरवून 2004 साली युती पुन्हा रणांगणात उतरली. मात्र येथेही सेना-भाजपच्या अंतर्गत स्पर्धेमध्ये सत्तेचे गणित फसले. यावेळी शिवसेना 62 तर भाजप 54 असे 116 वरच संख्या मर्यादित राहिली. पुन्हा आघाडीची सत्ता आली आणि शिवसेनेतील अस्वस्थता वाढली. एका वर्षातच निराश राणेंनी शिवसेनेतून बंड केले. त्यावेळी 35 आमदार त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले गेले. मात्र 11 आमदारांसह राणे बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये आले. विरोधी पक्षनेते पदावर रामदास कदम विराजमान झाले. आघाडीची सत्ता मागच्या पानावरून पुढे सुरूच होती.

2009 मध्ये पाच वर्षांनी पुन्हा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला बंडाचा फटका बसणार असे सांगितले जात होते. मात्र 44 जागा जिंकत शिवसेनेने आपले अस्तित्व राखले. तर भाजपकडे 46 चे संख्याबळ आले. या राजकारणात शिवसेनेचे विरोधीपक्ष नेतेपद गेले. भाजप विधानसभेत वरचढ ठरला. विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले. याच काळात राणेंपाठोपाठ राज ठाकरेही शिवसेनेतून बाहेर पडले. दोघांचेही लक्ष उद्धव ठाकरेच होते. यानंतरच्या निवडणुकीत मनसेने विधानसभा लढवून 13 जागा जिंकल्या होत्या. राणे काँग्रेसमध्ये मंत्रीपदावर कायम होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत दबदबा असलेल्या राणेंचा कुडाळ मतदार संघातून पराभव झाला. युतीने घवघवीत यश मिळवले. भाजपने 122 तर शिवसेनेने 63 जागा जिंकत सत्ता आणली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेला चांगले यश मिळाले आणि शिवसेना स्थिरावली असे वाटू लागले असताना शिंदेंचे हे मोठे बंड समोर आले आहे.

2014 ला युती सरकार आल्यानंतर सेना-भाजपने 5 वर्षे सत्ता चालविली. त्यानंतर शिवसेना सत्तत असलेली आघाडी अडीच वर्षे सत्तेवर राहिली. या काळात एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते ते मंत्री अशा पदावर आपले नेतृत्व पुढे नेत होते. 2004 साली एकनाथ शिंदे ठाण्यातून पहिले आमदार झाले. त्यानंतर 2009 मध्ये ते दुसर्‍यांदा जिंकून आले. या दोन्ही काळात शिंदे विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कार्यरत होते. आनंद दिघेंनंतर शिंदे हेच ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते होते. 2014 मध्ये युतीचे सरकार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्रस्तापित झाले. या काळात एकनाथ शिंदे काही काळ विरोधी पक्षनेते तर त्यानंतर मंत्री म्हणून कार्यरत झाले. इथूनच शिंदेंची शिंदेशाही सुरू झाली. 2019 च्या निवडणुकीत भाजपने 105 तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. दोघांचे बहुमत आले होते. मात्र शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे होते. यातून भाजपने दिलेला शब्द पाळला नाही अशी भावना शिवसेना पक्षप्रमुखांनी व्यक्त करत आघाडीचा नवा प्रयोग शरद पवारांच्या साथीने महाराष्ट्रात करण्याचा मनसुबा व्यक्त केला. यावेळी शिंदेनी प्रमुख भूमिका बजावली.या काळात सुरुवातीला भाजप नेते, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांबरोबर पहाटे शपथविधी करत या पक्षाचे जवळपास निम्मे आमदार पळवले होते. पण हे बंड फसले. शरद पवारांनी आपले पुतणे अजित पवारांचे बंड मोडून काढले. तेव्हापासून सेना- भाजप यांच्यात घमासान सुरू झाले.

आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले. मात्र हे भाजपला पटले नाही. आघाडीचे सरकार खेचण्यासाठी गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा ट्रॅप तयार केले पण आघाडी सरकार कायम राहिले. मात्र आता शिंदेंनाच शिवसेनेतून फोडून भाजपच्या नव्या सरकारची पायाभरणी फडणवीस यांनी केल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या साथीने एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे तब्बल 38 आमदार आपल्या तंबूत नेले आहेत. दोन्ही बाजूचे घमासान सुरू झाले आहे. सेनेचे काय होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र सेनेने यापूर्वी तीन मोठी बंडे थोपवून सत्तेपर्यंत येण्याचा मान मिळविला होता. हा इतिहास पाहता यापुढेही सेनेने पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आताच्या परिस्थितीत शिंदेंचे बंड यशस्वी झाले तर शिवसेनेला मोठी किंमत मोजाची लागणार आहे. ठाण्याचा वर्षांनुवर्षांचा बालेकिल्ला गमावण्याची भीती आहे. मुंबई महापालिका निवडणूकही तोंडावर आली आहे. आमदार हाताशी नसल्याने शिवसेनेने जिल्हाप्रमुखांवर आपले लक्ष केंद्रित करत पुन्हा पक्ष उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये एकेकाळी शरद पवार शिवसेनेला फोडण्यासाठी आघाडीवर होते, आतामात्र शिवसेनेला जोडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

काळाचा महिमा असा पहायला मिळत आहे. शिवसेनेवर स्वपक्षीयच तुटून पडले असताना काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. या नव्या सत्ता समीकरणातून महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा निश्‍चित झाली आहे. आता महाराष्ट्रात खरा सामना सुरू झाला आहे तो शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाच. या सामन्याचे काय होते? हे पुढील काळात समजेल.

Back to top button