जव्हार : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सबंध पालघर जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त, नाकेबंदी करण्यात आली आहे. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांचे अखत्यारीतील पाचही पोलीस स्थानके सज्ज झाले असून जिल्हा सीमा, राज्य सीमा भागात पाच ठिकाणी २४ तास नाकाबंदी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत मोखाडा पोलीस ठाणे अंतर्गत पालघर जिल्ह्याची नाशिक जिल्ह्याला व ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवर निळमाती व कारेगाव येथे चोवीस तास नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. तसेच खंबाळा, किरमिरा, दाभेरी या जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत येथे चेक नाके सुरू आहेत.
या करिता एक अधिकारी व तीन अंमलदार असा बंदोबस्त तैनात असून दोन्ही बाजू कडून येणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी सुरू आहे. तसेच दारू, पैसे, हत्यारे, एन. डी.पी.एस., याचे चेकिंग व पकडणे दरम्यान, कुठल्याही वाहनातून अवैध दारू, गुटखा तसेच अवैध रोक रक्कम अश्या बेकायदेशीर बाबी, शस्त्र याची वाहतूक होणार नाही यासाठी सतर्क नाकेबंदी सुरू आहे. शिवाय, कासा पोलीस स्टेशन येथे दिवशी शेत पाडा वाय जंक्शन येथे चेक नाका अशी जव्हार उपविभागात वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी सुरू आहे.
जव्हार पोलीस उपविभागातील पाचही पोलीस ठाणे अंतर्गत आदर्श आचारसंहिता पालन होण्यासाठी मर्गर्देशक सूचना देण्यात आल्या आहेत, शिवाय या भागात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
गणपतराव पिंगळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक, जव्हार