पालघर : नविद शेख
पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील २२ गावे आणि शंभर पाडयांना विजपुरवठा करण्यासाठी नियोजित उपकेंद्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. ढेकाळे गावाच्या हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या जागेत उपकेंद्र उभारणीसाठी जागा हसतांतरण आणि भाडे कराराचा प्रस्तावाला कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे. गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजना सुधारणा अधिष्ठित आणि निष्पती आधारीत योजने अंतर्गत पालघर तालुक्यातील ढेकाळे येथे पाटबंधारे विभागाच्या वांद्री प्रकल्पाच्या कॉलनीत महावितरण कंपनीला विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी ९९ वर्षाच्या भाडेकरारावर जागा हस्तांतरण आणि वार्षीक भाडे आकरणीचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे महामंडळाच्या नियामक मंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील महावितरण कंपनीच्या सावरखंड उपकेंद्रातून विजपुरवठा होत असलेल्या ढेकाळे फिडरवर
गेल्या काही वर्षांपासून विजेची समस्या आहे. पावसाळ्यात विजेची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत असल्यामुळे ढेकाळे भागात नवीन उपकेंद्र निर्मितीची मागणी केली जात होती. सहा वर्षांपूर्वी उपकेंद्र मंजूर झाले होते परंतु शासकीय जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे उपकेंद्र निर्मितीचे काम रखडले होते.
जि.प. सदस्यांच्या पाठपुराव्याला यश
उपकेंद्राच्या बांधकामासाठी ढेकाळे गावातील पाटबंधारे विभागाची जागा मिळवण्यासाठी स्थानिक जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जागेच्या मागणीचे पत्र दिले होते. सोमवारी ठाणे येथे कोकण पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांची भेट घेत डेकाळे येथील जागेच्या मागणीचे पत्र दिले होते.
माजी खासदार, स्थानिक आमदारांचे प्रयत्न
माजी खासदार राजेंद्र गावित यांनी उपकेंद्र निर्मितीसाठी ढेकाळे येथील पाटबंधारे विभागाची जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केले. स्थानिक आमदार राजेश पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांची संयुक्त बैठक घेत जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
टेकाळे येथील बांद्री प्रकल्प कॉलनीच्या हद्दीतील एक एकर जमीन ९९ वर्षाच्या मुदत कालावधीसाठी भाडे तत्वावर मिळण्याच्या मागणी नुसार पाटबंधारे विभागाच्या उपविभागाचा कार्यालयाने पाहणी करून कार्यकारी अभियंत्यांना अहवाल सादर केला होता.
दरम्यानच्या काळात महावितरण कंपनीने मागणी केलेल्या जागेसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या चालू वर्षाच्या बाजारमुल्य दरपत्रकानुसार प्रती वर्ष भाडे आकरणी काढण्यात आली होती. नवीन उपकेंद्र प्रस्तावित केलेल्या ठिकाणी असलेल्या ना दुरुस्त विश्रामगृह महावितरण कंपनीकडून तोडले जाणार असून तोडलेल्या साहित्यावर जलसंपदा विभागाची मालकी बाबत महावितरण कंपनीकडून पाटबंधारे विभागाला कळवल्यानंतर महावितरण कंपनीने पाटबंधारे विभागासोबत ९९ वर्षाच्या करारासाठी सहमती दर्शवली होती. मागणी केलेल्या जागेसाठी वार्षिक आकरणी काढण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या बाजारमुल्य दरपत्राका नुसार एक हजार ५७६ रुपयांची वार्षिक आकारणी करण्यासाठी आला आहे. विजेची समस्या मार्गी लागणार असल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जागेचा भाडेकरार मंजूर होण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरु होता. नुकतेच महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत भाडे कराराला मंजूरी देण्यात आली आहे. नवीन उपकेंद्र निर्माण होऊन पालघरच्या पूर्व भागातील विजेची समस्या सुटणार आहे. जागेची मागणी आणि पाठपुराव्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकत्यांनी मेहनत घेतली.
- राजेश पाटील, आमदार
महावितरण कंपनी आणि पाटबंधारे विभागा दरम्यानच्या समन्वय साधून भाडे करारातील त्रुटी दूर करून वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पोहचवला. अधीक्षक अभियंता आणि संचालक स्तरावर पाठपुरावा करून प्रस्ताव नियामक मंडळाकडे पाठवण्यात आला होता. नियामक मंडळाने प्रस्ताव मंजूर केल्याने सावरे एमबुर जिल्हा परिषद गटात समावेश असलेल्या गाव पाड्यांचा विजेचा प्रश्न सुटणार आहे.
विनया पाटील, जिल्हा परिषद सदस्या