Nashik Municipal Corporation | नाशिकच्या पाणीप्रश्नावरून महासभेत रणकंदन

Nashik Municipal Corporation | व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन, 15 दिवसांत 'स्काडा' होणार कार्यान्वित
Nashik Mayor Reservation
नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील पाणीप्रश्नावरून नाशिक महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) वादळी चर्चा झाली. कृत्रिम पाणीटंचाईवरून संतप्त नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांना लक्ष्य करत कारवाईची मागणी केली. शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

Nashik Mayor Reservation
Shalarth ID scam | नाशिक विभागातील 841 शालार्थ आयडी बनावट! जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 638 प्रकरणांचा फटका

तर, व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन, १५ दिवसांत 'स्काडा' प्रणाली कार्यान्वित करणे, गंगापूर धरण थेट जलवाहिनीचे काम महिनाभरात पूर्ण करण्यासह बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त मनीषा खत्री यांनी पाणीपुरवठा विभाग तसेच स्मार्ट सिटी कंपनीला दिले.
अनियमित पाणीपुरवठ्यावरून सिडकोतील नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार रणकंदन बघायला मिळाले. शहरातील कृत्रिम पाणीपुरवठ्याचा ठपका नगरसेवकांनी अधीक्षक अभियंता धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीची मागणी केली. सभागृहात या नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे नगरसेवकांच्या या आंदोलनाने सत्ताधारी भाजपलाही घरचा आहेर मिळाला.

भूषण राणे यांनी पवननगरचे पाणी कोणाच्या तरी दबावाखाली पळवले जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाना साधला. बडगुजर यांनीही प्रत्युत्तर देत पाणीपुरवठा वितरण प्रणाली व पंपिंग यंत्रणेतील दोषामुळेच पाणीप्रश्न उद्भवल्याचा दावा केला. यामुळे मुकेश शहाणे व बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याकडे लक्ष वेधले.

कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही पाणीप्रश्न कायम असणे दुर्दैवी असल्याचे नमूद करत अजय बोरस्ते यांनी काम करता येत नसेल तर धारणकर यांनी राजीनामा द्यावा, असे सुनावले. सिडकोसह नाशिकरोड, पंचवटी, सातपूर, पश्चिम व नाशिक पूर्वच्या नगरसेवकांनीही पाणीप्रश्नावरील चर्चेत सहभाग घेतला. आयुक्त मनीषा खत्री यांनी पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत व्हॉल्व्हमनचे फेरनियोजन करण्याचे आदेश देताना सुरळीत पाणीपुरवठ्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांवर असल्याचे स्पष्ट केले.

नगरसेवक, सुरक्षारक्षकांत वाद

पाणीप्रश्न मांडण्यासाठी हंडा घेऊन सभागृहात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला. त्यामुळे काही काळ सुरक्षारक्षक आणि नगरसेवकांत शाब्दिक खडाजंगी झाली. 'आम्ही सत्ताधारी आहोत, हंडा कोणाला मारणार नाही', अशी भूमिका घेत नगरसेवकांनी हंडा सभागृहात नेण्याचा आग्रह धरला. अखेर हंड्यासह ते सभागृहात दाखल झाले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच पाणीप्रश्नावर अशा प्रकारे आंदोलन केल्याने महासभेपूर्वी महापालिका वर्तुळात या आंदोलनाची चर्चा रंगली. संबंधित प्रभागांतील पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली.

काम करा अन्यथा, घरी बसा

पाणीपुरवठा विषयक 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू असल्याने आयुक्तांनी स्मार्ट कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनादेखील महासभेत पाचारण केले होते. 'स्काडा' प्रणाली येत्या महिनाअखेर कार्यान्वित करा, बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राची कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा घरी बसा, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.

सिडकोतील नगरसेवकांचे आंदोलन

प्रभाग क्र. २७, २८ आणि २९ मधील पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरsevिका प्रतिभा पवार, छाया देवांग, भूषण राणे आणि शरद फडोळ हातात दूषित पाण्याच्या बाटल्या, जार तसेच हंडा घेऊन महापालिका सभागृहात दाखल झाले. नवीन नाशिक परिसरातील काही भागांत पाणीपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने जाणवत आहे. नागरिकांना नियमित आणि पुरेसा दाबाने पाणी मिळत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. पवननगरचा जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी भेटत नाही. त्यामुळे मुकणेचे पाणी या भागाला मिळावे, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात हंडा आणि पाण्याची बाटली घेऊन आंदोलन करण्यात आले.

Nashik Mayor Reservation
Nashik Ayushman Bharat Card | नाशिक जिल्ह्यात 64 टक्के नागरिक आयुष्यमान कार्डपासून वंचित! रेशनकार्डचा मोठा अडसर

महापौरांचे आदेश

  • शहरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा.

  • व्हॉल्व्हमनच्या तातडीने विभागनिहाय बदल्या करा.

  • पाणीपुरवठा नियोजनाचा चार्ट तयार करा.

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टँकर संख्येत वाढ करा.

  • सप्टेंबरअखेर 'स्काडा' मीटर बसवा.

  • अन्यथा सुमंत मोरे यांना घरी पाठवणार.

  • मोटरद्वारे होणाऱ्या पाणीचोरीवर लक्ष ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.