नाशिक : वैभव कातकाडे
राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासातील अनेक समस्यांपैकी एक असलेल्या 'चिल्लर'चा प्रश्न नवीन अँड्रॉइड तिकीट मशीनमुळे निकाली निघू लागला आहे. ऑनलाइन व्यवहारांकडे कल वाढू लागला असून, त्यातून नाशिक आगारामध्ये गेल्या आठ महिन्यांत पाच कोटी १८ लाख ४२ हजार २०५ रुपयांची तिकिटे देण्यात आली आहेत. यात सर्वाधिक व्यवहार हे शहरकेंद्री नाशिक-१ आगारांतर्गत तीन कोटी १४ लाख २९ हजार ८७५ रुपये झाले आहेत. पुढारी विशेष बदलत्या काळानुसार लालपरीने देखील कात टाकली आहे.
खासगी ट्रॅव्हल्सच्या दर्जावर बसचा चेहरामोहरा बदलत असून, त्यात आता इलेक्ट्रिक बसदेखील धावू लागल्या आहेत. त्यात पारंपरिक असलेली सुट्या पैशांची अडचण ही अँड्रॉईड तिकीट मशीनच्या माध्यमातून निकाली निघाली आहे. रोखऐवजी ऑनलाइन पद्धतीने तिकिटे घेणे सोयीस्कर असल्याने हा बदल टेक्नोसॅव्ही प्रवाशांकडून स्वीकारला, असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाव ते शहर जोडणारी लालपरी प्रवाशांना मोठा आधार ठरते. त्यात आता महामंडळ डिजिटल होत असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.
ऑनलाइन तिकीट व्यवहार सुविधा प्रवासी व वाहकांसाठी फायद्याची ठरत आहे. तरुण ते मध्यमवयीन सर्वांकडे मोबाइल असतो. त्यातील बहुतांश लोक यूपीआय वापरतात. त्यामुळे कॅशलेस तिकीट सुविधेला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक विभागात २,०६२ तिकीट मशीन कार्यरत आहेत.
किरण भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक
सुट्या पैशांची समस्या निकाली काढण्यासाठी महामंडळाने वाहकाच्या हाती डिजिटल तिकीट मशीन दिले. त्यानंतर ही काही वाहकांचा पूर्वापार व्यवहारांसाठी अट्टहास कायम दिसतो. ऑनलाइन तिकीट घेताना बहुतांश वेळा नेट प्रॉब्लम येतो. या तांत्रिक कारणाचा बाऊ करत वाहक रोख तिकीट घेण्याचा दबाव टाकतात. 'व्यवहार अडकेल, तुम्हालाच त्रास होईल', 'लवकरच करा मला इतरांचेही तिकीट काढायचे आहेत', अशी पठडीतील वाक्य ऐकावयास मिळतात. याबाबत वाहकांचे वरिष्ठांनी प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रवासी सांगतात.