नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून राज्यात विकासात्मक कामे सुरू आहेत. 'लाडकी बहिण' सारख्या योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळेच विरोधकांना धडकी भरली आहे, अशी टीका करत केंद्र सरकारविरोधात गैरसमज पसरवत विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत मते मिळवली. ते आता आगामी विधानसभा निवडणुकीत होणार नाही, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा.शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. खा. शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधकांकडून केवळ राजकारण सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी गैरसमज पसरवत मते मिळविली ती आता विधानसभेत होणार नाही. तुमची सत्ता असताना अडीच वर्षे फक्त घरी बसण्याचे काम केले. सगळ्या कामांमध्ये खो घातला. आता जनतेला अधिक काळ अंधारात ठेवता येणार नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. नाशिकमधील संघटनात्मक बैठकांविषयी खा. शिंदे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मतदारसंघनिहाय चाचपणी केली. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचत आहेत का, लाभार्थ्यांना काही अडचणी तर नाही ना, याची माहिती घेत पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी व्यूव्हरचना कशी असावी यासह संघटनाबांधणीबाबत चर्चा झाली, असे नमूद करताना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे महिला वर्गात उत्साह दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट, व शिवसेना शिंदे गट एकत्र महायुती म्हणून लढणार असल्याचे नमूद करत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, असा दावा खा. शिंदे यांनी केला. जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील. मतदारसंघनिहाय बैठकांचा लेखाजोखा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.