नाशिक : वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पावसाने नाशिक शहर व परिसराला शनिवारी (दि. १९) झोडपून काढले. जोरदार सरींमुळे शहरातील रस्ते जलमय झाल्याने शहरवासीयांची कोंडी झाली होती. ग्रामीण भागातही पावसाचा जोर अधिक असल्याने कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. जिल्ह्याला पुढील दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत पाऊस सुरू होता.
राज्यात आर्द्रता व कमाल तसेच किमान तापमानात वाढ झाल्याने ऋतुचक्र बदलले आहे. परिणामी, पावसाळी वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार सरी बरसत आहेत. शनिवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली. शहर व परिसरात सकाळपासून तीव्र उकाडा जाणवत होता. दुपारी 3 च्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. पुढील काही मिनिटांमध्येच जोरदार पावसाला प्रारंभ झाला. तासाभराच्या सरींमुळे रस्ते जलमय झाले, तर सखल भागांमध्ये पाणी साचले. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाल्याने ठिकठिकाणी कोंडी झाली. सुटीचा मुहूर्त साधत दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या पावसाने गाठले. त्यामुळे आडोसा शोधण्यासाठी धावपळ सुरू होती. दुसरीकडे दिवाळीनिमित्त रस्त्यावरील छोट्या-मोठ्या वस्तू विक्रेत्यांना पावसाने दणका दिला. शहरात तासाभरात १.८ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव, बागलाण, नांदगाव, चांदवड व देवळा आदी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. अन्य तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात सरी बरसत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने सोमवार (दि. २१) पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. सामान्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस परतला आहे. त्यामुळे गंगापूर- दारणासह विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळी ६ वाजता ५७१ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला. दारणातून ३०० व वाकीतून २३२ क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग केला जातोय. या व्यतिरिक्त नांदूरमध्यमेश्वरमधून १६१४, वाघाड २५, तिसगाव ११, ओझरखेड २२८, पालखेड ४३७ तसेच पुणेगावमधून १५० क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे.