पुढारी विशेष: नाशिकमधील दीड लाखांवरील मिळकती स्ट्रक्चरल आॉडीटविना
नाशिक : आसिफ सय्यद
नाशिक शहरात दीड लाखांवर मिळकती ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या असून, महापालिकेच्या स्थापनेपूर्वीच्या काळातील जवळपास २५ टक्के जुन्या मिळकती आजही शहरांमध्ये उभ्या असल्याचे धक्कादायक वास्तव पर्यावरण विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे. ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॉडीट बंधनकारक असताना महापालिकेने वारंवार सूचना देऊनही संबंधित मिळकतधारकांनी इमारतींचे स्ट्रक्चरल आॉडीट केलेले नाही. यापैकी अनेक इमारती या धोकेदायक स्थितीत असून, जोरदार पाऊस, वादळवाऱ्यात इमारती कोसळून जिवित वा वित्त हानी होण्याचा धोका आहे.
अशी आहे मिळकतींचे वयोमान
७० वर्षांपेक्षा जास्त जुन्या मिळकतींची संख्या - २५,१०२
५० ते ७० वर्षे जुन्या मिळकतींची संख्या- २८,९७१
२० ते ५० वर्षे जुन्या मिळकतींची संख्या- १,०३,२८४
नाशिक शहराला पौराणिक पार्श्वभूमी आहे. पंचवटी, जुन्या नाशिकसह गावठाण भागात अनेक जुने वाडे, घरे आजही उभी आहेत. यातील अनेक जुने वाडे, धोकेदायक स्थितीत असून गेल्या काही वर्षात काही वाड्यांची पडझड देखील झाली आहे. काही धोकेदायक स्थितीत आहेत. या धोकेदायक घरांविषयी महापालिकेच्या पर्यावरण अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. नाशिकच्या शहर विकास आराखड्याचा संदर्भ देऊन शहरातील मिळकतींची माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे स्थापत्यशास्त्राच्या नियमानुसार किंबहुना नगरचना विभागकड़ून दरवर्षी तीस वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित इमारतीची रहिवाश क्षमता तपासली जाते. त्यासाठी महापालिकेतील खाजगी स्ट्रक्चरल ऑडिट निश्चित केले असून त्यांच्याकडून रहिवाशांनी आपल्या मिळकतीचे ऑडिट करून घेणे अपेक्षित आहे. नाशिक शहरातील सुमारे सव्वा पाच लाख मिळकतींपैकी तब्बल १ लाख ५७ हजार ३५७ मिळकती या तीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. मात्र या मिळकतधारकांनी स्ट्रक्चरल आॉडीट केलेले नाही.
२५ हजार मिळकती ७० वर्षे जुन्या
नाशिक शहरातील सुमारे २५ हजार १०२ मिळकती या ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मिळकती १४,६४२ मिळकती या नाशिक पूर्व विभागातील आहेत. त्याखालोखाल पंचवटीत ६,६७९, सिडकोत १९३८, सातपूर ७६४, नाशिक पश्चिम ६१३, तर नाशिकरोड विभागात ४६६ मिळकती ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत.
२९ हजार मिळकती ५० वर्षे जुन्या
शहरातील तब्बल २८ हजार ९७१ मिळकती या ५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत. यात नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक १२,५५३, पंचवटी ६६५०, सातपूर ४५७५, नाशिकरोड २४४०, सिडको १४३५ तर, नाशिक पश्चिम विभागात एकूण १३१८ मिळकती या ५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या व धोकेदायक स्थितीत आहेत. या मिळकतींना पुनर्विकासाची गरज आहे.
गावठाणातील ७७ हजार मिळकती धोक्यात
पंचवटी व नाशिक पूर्व या दोन्ही महापालिकेचे विभागात सर्वाधिक जुने मिळकती आहेत. आज येथे साठ वर्ष व चाळीस वर्ष जुन्या इमारतींची संख्या ७० टक्केहून अधिक आहे. नाशिक पूर्व मध्ये ४१ हजार २६८ मिळकती या २० वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या आहेत. त्याखालोखाल पंचवटी विभागामध्ये ३३ हजार ९५० जुन्या मिळकती जुन्या आहेत. सिडकोत ४४२७९, नाशिक रोड १४,३८०, नाशिक पश्चिम ५९५७, सातपूर १६,९८१ मिळकती २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उभ्या आहेत.