नाशिक : चोरट्यांनी शहरातील वेगवेगळ्या परिसरांमधून १ ते २९ आॉगस्ट दरम्यान ५२ वाहने चोरून नेली आहेत. त्यापैकी २ रिक्षा, ४ चारचाकी वाहने व एक ट्रकचाही समावेश आहे. चोरीस गेलेल्या वाहनांची किंमत पोलिस दप्तरी २२ लाख ९६ हजार रुपये इतकी देण्यात आली आहे.
शहरातून दररोज वाहने चोरीस जात आहेत. वर्दळीच्या ठिकाणांहून सर्वाधिक वाहन चाेरीच्या घटना घडत आहेत. तसेच रात्री घराबाहेर किंवा पार्किंगमधून वाहने चोरीस जात आहेत. आॉगस्ट महिन्यात शहरातील देवळाली कॅम्प पाेलिस ठाणे वगळता १३ पैकी १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सर्वाधिक वाहन चाेरी रात्री झाल्या आहेत. चोरट्यांनी शासकीय कार्यालयांजवळील परिसर, बाजारपेठा, निवासी वस्त्या या ठिकाणांहून वाहने चोरली आहेत. काही वाहने चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शहरातील इतर परिसरात बेवारस स्थितीत सोडून दिल्याने त्या पुन्हा मिळाल्या. त्यामुळे पोलिस दप्तरी ही वाहने चोरी झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल नसल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, शहरात आॉगस्ट महिन्यात सर्वाधिक वाहन चाेरीच्या घटना पंचवटीच्या हद्दीत घडल्या आहेत. येथील धार्मिक स्थळे व रहिवासी भागातून वाहने चोरीस जात असल्याचे उघड झाले आहे. चोरीस गेलेल्या वाहनांपैकी काही वाहनांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी पकडलेल्या वाहन चोरट्यांकडील माहितीनुसार, वाहन चोरल्यानंतर चोरटे परजिल्ह्यात वाहन विक्री करण्यावर भर देत असल्याचे आढळून आले. वाहनांचा व्यवहार केल्यानंतर खरेदीदाराकडून रक्कम घेत कागदपत्रे आणून देतो असे सांगत चोरटे वाहन विक्री करतात. त्याचप्रमाणे काही चोरट्यांनी मौजमजा करण्यासाठीही वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
पंचवटी (१४), उपनगर (६), आडगाव (५), नाशिकरोड (५), इंदिरानगर (५), गंगापूर (४), अंबड (३), मुंबईनाका (३), सातपूर (२), म्हसरुळ (२), भद्रकाली (२), सरकारवाडा (१)
वाहने चाेरी केल्यानंतर चोरट्यांनी चोरीची वाहने इतर गुन्ह्यांमध्ये वापरल्याचेही उघड झाले आहे. माजी नगरसेविका ममता पाटील यांच्या घरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनीही गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले होते. त्याचप्रमाणे इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही चोरीच्या वाहनांचा वापर झाल्याचे समेार आले आहे.