

देवळा (नाशिक) : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून, शेतातील पिके वाया गेली आहेत. त्याचबरोबर शेतीला पूरक असलेल्या व्यवसायालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला.
डोंगरगाव येथील शेतकरी प्रकाश पानसरे यांच्या निंबोळा रस्त्याला असलेल्या शेतातील पोल्ट्री शेडमध्ये रविवारी (दि. 26) रात्री झालेल्या पावसाचे पाणी अचानक घुसल्याने दोन दिवसांत लिफ्टिंगला आलेल्या 200 ते 300 कोंबड्या जागेवर मृत्युमुखी पडल्या. उर्वरित कोंबड्यांवरही मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा झाल्याने त्यातील काही गारठून मरण्याची शक्यता आहे.
या आपत्तीमुळे पानसरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढवले आहे. या घटनेबाबत कंपनी प्रशासनाला कळविण्यात आले असल्याने कंपनीच्या ध्येय धोरणानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकार्यांनी दिली. तालुक्यातील शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांना तोंड देत असताना अशी आपत्तीदायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मालेगाव : शहरासह कसमादेत तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सलग पाऊस सुरू असल्याने शेतशिवार जलमय झाले आहे. शेतातील पाणी काढण्यासही उसंत मिळत नाही. गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे झालेल्या दुर्घटनांत जाटपाडे व कुकाणे येथे वीज पडून दोन गायी ठार झाल्या, तर उंबरदे येथे विजेच्या धक्क्याने गाय ठार झाली. तीन घरांच्या भिंती, छत कोसळले, घर पडले. सौंदाणे येथील गलाठी नदीला आलेल्या पुराचे पाणी घरे, दुकानांमध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नदीच्या पुरातून संदीप खैरनार या तरुणाला वाचविण्यात महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. पावसामुळे कांदा, मका, बाजरी, भुईमूग, कापूस सारे काही भुईसपाट झाले. उरला सुरला चाराही पावसात भिजल्यामुळे सारा खरीप हंगामच वाया गेला. बागलाण, देवळा, मालेगाव, कळवण या सर्वच तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील वडनेर, अजंग या दोन मंडळांत काल एकाच दिवसात 47 मिमी पाऊस झाला. दुर्लक्षित असलेल्या सौंदाणे मंडळात 32 मिमी पावसाची नोंद झाली. गलाठी नदीला जोरदार पूर आला. हा पूर अनेक वर्षांनंतर आल्यामुळे पुराचे पाणी घरे, दुकानात शिरले. हिरूबाई पवार यांची शाळा, ताराचंद पवार यांचे कापड दुकान व जियोद्दिन शेख यांच्या सायकल दुकानात पुराचे पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. सायतरपाडा येथील नर्मदाबाई पाटील, पोहाणे येथील विजय पवार व ढवळेश्वर येथील पोपट निकम यांची घरे वादळीवारा व पावसामुळे कोसळली. भिंत पडून नुकसान झाले. गोठा, कांदाचाळी यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दोन दिवसांत सर्व मंडळ मिळून 50 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. कळवाडी मंडळ क्षेत्रात 213 टक्के, करंजगव्हाण 183 टक्के, तर अजंग व झोडगे मंडळात 160 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सौंदाणे मंडळ (71 टक्के) वगळता सर्व मंडळांनी 100 टक्क्यांची सरासरी ओलांडली आहे. तालुक्यात सरासरी 138 टक्के पाऊस झाला आहे. तालुक्याची पावसाची सरासरी 499.6 असून, रविवार (दि. 26) अखेर प्रत्यक्षात 694 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
या हंगामात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीने खरीप पूर्णपणे वाया गेला होता. मका, शाळू, खोंडे व अन्य पिकांपासून थोडाफार आधार चार्याला होणार होता. सलगच्या पावसाने मका कणीस व चाराही पावसात भिजल्यामुळे चार्याचादेखील चिखल झाला. मका व कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसला. सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपाचे नुकसान झाले. कांद्याचे नुकसान न मोजता येण्याजोगे आहे. शासनाची मदतही तोकडीच ठरणार आहे.
देवळा (नाशिक) : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सोमवारी (दि. 27) चिखल तुडवत शेतकर्यांच्या बांधावर जाऊन केली.
आमदार डॉ. आहेर यांनी उपस्थित अधिकार्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तालुक्यातील पश्चिम भागात खर्डे, कनकापूर, कांचने, शेरी, भऊर, विठेवाडी, माळवाडी आदी भागांत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार डॉ. आहेर यांनीकेली. सोमवारीअधिकार्यांसमवेत अतिदुर्गम कांचनेत कांद्याचे रोप, मका, शेतात साचलेले पाणी, विहीर, रस्ता, पूल आदी नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी एस. एम. पाखरे, कृषी सहायक मायावती निकम, मंडळ अधिकारी के. टी. ठाकरे, तलाठी मनोज खंबाईत, राकेश बच्छाव, ग्रामविकास अधिकारी सरिता मिस्त्री, अरुण पाटील, सरपंच बारकू वाघ, जगदीश शिंदे, प्रमोद पाटील, किशोर आहेर, राकेश हेंबाडे, नामदेव हेंबाडे, महेंद्र आघाव, शरद हेंबाडे, लखन हेंबाडे, दादाजी गोसावी, आदींसह शेतकरी उपस्थित होते.
रविवारच्या (दि.26) रोजी किर्र अंधारात सौंदाणेतील गलाठीला पूर आला. यात दुचाकीने फरशी पुलावरून घराकडे जाणारा संदीप बंडू खैरनार (22) हा वाहून गेला. नदीपात्राचा प्रवाह जोरदार असतानाच त्याला झाडाचा आधार मिळाला. एका बाजूला तो जीव मुठीत धरून उभा होता. ही माहिती गावात समजताच त्यांनी मंत्री दादा भुसे यांना कळविले. भुसे यांनी चेतन पवार व सहकार्यांना मदतीसाठी पाठवित मनपा अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाचे जवान शकील तैराक यांनी अधीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यांच्या मदतीने मोहीम राबवून पूर पाण्यातून दुसर्या थडीला पोहोत जात लाइफ जॅकेट व दोरीच्या मदतीने संदीपला वाचविण्यात यश मिळविले. ग्रामस्थांनी शकील व अग्निशमन दलाचे आभार मानले.
आमदार दिलीप बोरसे व अपर जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
डांगसौंदाणे : गाव व परिसरात आठवड्यापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव नाही. पावसाने परिसरासह बागलाण तालुक्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी आमदार दिलीप बोरसे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार कैलास चावडे, कृषी अधिकारी नरेंद्र महाले आदींनी सोमवारी (दि. 27) केली.
आमदार बोरसे यांनी महसूल व कृषी यंत्रणेला सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. अवकाळीमुळे मका सडला, रब्बी हंगामासाठी टाकलेले कांदा बियाणे अंकुरावस्थेतच जमिनीत गाडले गेले. परिणामी, शेतकर्यांच्या हजारो एकर शेतीचे नुकसान झाले. अंदाजे 10 ते 15 कोटींचे कांदा बियाणे वाया गेले. ऐन दिवाळीत शेतकर्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आमदार बोरसे यांनी पाहणी दरम्यान शेतकर्यांना दिलासा देत सरकार त्यांच्या पाठीशी असून, कोणीही पंचनाम्यांपासून वंचित राहणार नाही. नुकसानग्रस्त शेतकर्यांना योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू तसेच अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार कैलास चावडे यांनी पिकांचे प्रत्यक्ष निरीक्षण करतानाच पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची हमी दिली. ग्रामसेवक व तलाठी यांना पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या. संकट मोठे असले, तरी खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवा. मदत मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण पाठपुरावा करू, असे सांगत पंचनामे करण्यास अधिकार्याने टाळाटाळ केल्यास थेट तहसीलदारांकडे तक्रार करण्याच्या सूचना आमदार बोरसे यांनी दिल्या. यावेळी नुकसानीचा सर्वाधिक फटका बसलेल्या कैलास केल्हे, रावसाहेब सोनवणे, विवेक पवार, निंबा बागूल, महेश वाघ, नीलेश गौतम आदींच्या शेतात पाहणी करण्यात आली.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शरद भामरे, प्रवीण पवार, मंडळ अधिकारी नितीन धोंडगे, तलाठी अजय खांडवी, मनोज सोनवणे, सचिन सोनवणे, भारत सोनवणे, कैलास बोरसे, संजय देशमुख, दीपक वाघ, मोठाभाऊ सोनवणे, दीपक देवरे, संजय सोनवणे, निखिल खैरनार आदी उपस्थित होते.