सातपूर : शिवाजीनगरमधील बांधकाम साइटच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्बन नाक्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्त्यावर खासगी बांधकाम साइटवर मोठा खड्डा खोदण्यात आला होता. यात पावसाचे पाणी साचले होते.
सोमवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास १२ ते १५ वर्षे वयाची ४ ते ५ मुले खड्ड्यात पोहण्यासाठी गेले असता, ही घटना घडली. अंकुश किरण गाडे (१५, रा. शिवाजीनगर जलकुंभ) व प्रणव विनोद सोनटक्के (१५, रा. अथर्व सुपर मार्केट, पठार चौक) दोघेही बालशिक्षण मंदिर जनता विद्यालयात नववीमध्ये एकाच वर्गात शिकत होते. सायंकाळी 5.30 वाजता शाळेतून आल्यानंतर मित्रांसमवेत पोहायला गेले असता, अंकुश व प्रणव या दोघांचे पाण्यातील चिखलात पाय फसल्याने ते बुडाले. सायंकाळी 7 च्या सुमारास सातपूर अग्निशमन दलाने घटनास्थळी पाण्यात गळ टाकून मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर जीवरक्षक संदीप गुंबाडे व सहकाऱ्यांनी पाण्यात उड्या घेऊन दोन्ही मुलांना वर काढले.