सिडको : अंबड लिंकरोड परिसरातील चुंचाळेलगत असलेल्या भोर टाउनशिप येथील शेततळ्यात पोहोण्यास गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. 22) दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. अशरफ खान (८) व इरशाद शहा (९) अशी या मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनगर भागात विराटनगर येथे राहणारे अशरफ खान (८) व इरशाद शहा (९) हे दोघे मित्रासमवेत रविवारी दुपारी भोर टाउनशिप येथील सचिन भोर यांच्या शेतातील शेततळ्यात पोहोण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने अशरफ व इरशाद हे दोघे पाण्यात बुडाले. त्यांच्याबरोबरच्या मित्राने विराटनगर गाठत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर नागरिकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. सिडको अग्निशमन दलाचे जवान, अंबड चुंचाळे पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने जेसीबीच्या सहाय्याने बांध फोडून तळे रिते करण्यात आले. सायंकाळी 7 वाजता दोघांचे शव पाण्यातून बाहेर काढण्यात आले. दोन्ही मुले मदरशामध्ये शिक्षण घेत होते. इरशादच्या पश्चात आई, वडील दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.