नाशिक : गळफास घेतलेल्या पतीच्या मृतदेहाच्या खाली मांडलेल्या पूजेचे साहित्य व तेथेच पत्नीकडून पूजाविधी होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार अघोरी आणि जादूटोणा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र या चर्चेचे नाशिकरोड पोलिसांनी खंडन केले आहे. हा प्रकार अघोरी किंवा जादूटोण्यातून झालेला नसून कौटुंबिक जाचातून घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
जेलरोड भागात पाण्याची टाकी परिसरात ब्रिजनगरमध्ये ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठपूर्वी नवनाथ भगवंत घायवट (५४) या व्यक्तीने त्याच्या राहत्या घरी स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेला आठवड्याचा कालावधी घडल्यानंतर घायवट यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत घायवट यांच्या मृतदेहाखाली आणि आजूबाजूला धार्मिक पूजा मांडलेले दिसून येते. जवळच एक महिला बसलेली आहे. याशिवाय मृतदेहाच्या अंगावरही ठिकठीकाणी कुंकवासारखे पूजेचे साहित्य लावलेले दिसून येत असल्याने हा प्रकार अघोरी आणि जादू टोण्याचा असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली. मात्र पोलिसांनी यास नकार दिला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नवनाथ यांची पत्नी मानसिक रुग्ण असून तिच्यावर वैदयकीय उपचार सुरु आहेत. घटनेच्या दिवशी त्यांच्या घरी दुर्गाष्टमीची पूजा आयोजित केली होती. याच वेळी कदाचित त्यांच्यात काहीतरी कौटुंबिक कलह होऊन नवनाथ यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.