Nashik Rain Update | सुखद जलधारांनी जिल्ह्याचा कुंभ ओतप्रोत

धरणे ८७ टक्के भरली : २४ प्रकल्पांमध्ये ५५ हजार ८५० दलघफू साठा
Nashik Rain Update - godavari flood
सुखद जलधारांनी जिल्ह्याचा कुंभ ओतप्रोतpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : शहरवासीयांवर पाणीकपातीचे संकट, तर ग्रामीण भागात टँकरच्या फेऱ्या अशी स्थिती असलेल्या नाशिक जिल्ह्यात जोर'धार' पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख धरणे काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये तब्बल ५५ हजार ८५९ दक्षलक्ष घनफूट क्यूसेक इतका साठा झाला असून, हे प्रमाण ८७ टक् आहे. धरणे भरल्याने नाशिककरांची पिण्याच्या पाण्याची चिंता काहीशी मिटली आहे.

गेल्या जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा ८ टक्के जलसाठा होता. त्यामुळे नाशिककरांवर पाणीटंचाईचे ढग गर्दी करून आले होते. राज्यातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरत असताना नाशिकमध्ये मात्र पावसाने दडी मारली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बेपत्ता असलेल्या पावसाने नंतर मात्र दमदार हजेरी लावली अन‌् धरणसाठ्यात वाढ होण्यास प्रारंभ झाला. साधारणत: १० ते १२ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने, जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरली आहेत. जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह, पालखेड धरण समूहातील जवळपास सर्वच धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झाला आहे, तर गिरणा खोरे धरण समूहातील निम्म्या धरणांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील धरणांचा साठा ७२.३९ टक्के इतका होता. मात्र, अवघ्या दोनच दिवसांत त्यात मोठी वाढ होत, ८७ टक्क्यांहून अधिक झाला आहे. पावसाची संततधार अजूनही सुरूच असून, जलसाठ्यात आणखी वाढ होणार आहे.

प्रमुख धरणांची स्थिती

गंगापूर - ९२ टक्के

दारणा - ९७ टक्के

पालखेड - ९०

गौतमी गोदावरी - ९६ टक्के

चाणकापूर - ८८ टक्के

मुकणे - ९७ टक्के

भावली, आळंदी, भोजापूर, वालदेवी - १०० टक्के

सहा धरणे शंभर टक्के

सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील २४ पैकी सहा धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामध्ये गंगापूर धरण समूहातील आळंदी, पालखेड धरण समूहातील वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, तर गिरणा खोरे धरण समुहातील केळझर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर गंगापूर, हरणबारी, दारणा, गौतमी-गोदावरी, मुकणे ही धरणे ९० टक्क्यांवर भरली आहेत.

'नाथसागर' ४० टक्क्यांवर

मराठवाड्याची तहान भागविण्यात नाशिक जिल्ह्यातील धरणांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील धरणांतून बाहेर पडणारे पाणी छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी (नाथसागर) प्रकल्पाच्या कुंभात पोहोचले. जायकवाडीतील बहुतांश जलसाठा हा नाशिकच्या धरणांवर अवलंबून असतो. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या या धरणात आजघडीला ४० टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून आतापर्यंत जायकवाडीला २०.४० टीएमसी पोहोचले आहे. गंगापूर, दारणा व नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा आदी धरणांतून सातत्याने विसर्ग सुरू असल्याने, यंदा जायकवाडीत समाधानकारक जलसाठा होण्याची चिन्हे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news