नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात जोर'धार' पाऊस बरसत असल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने, नाशिक महापालिकेकडून नदीकाठच्या नागरिकांना सातत्याने सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. यासाठी महापालिकेने पथके तैनात केली असून, ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने नदीकाठच्या लोकांना सूचित केले जात आहे.
संततधारेमुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमधील जलसाठा वाढल्याने, हजारो क्यूसेक लिटर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांसाठी धोका निर्माण झाला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. पाण्याचा विसर्ग वाढल्यास, नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठीदेखील प्रशासनाने नियोजन केले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून दोन-दोन कर्मचाऱ्यांचे पथके तयार करून, या पथकांच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांसाठी ०२५३-२५७१८७२ व ९६०७००९१०१ हे दोन दूरध्वनी क्रमांक जारी केले असून, मदतीसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.
धरणातील विसर्गामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने, नागरिकांनी नदीकिनारी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचेही प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. दुसरीकडे पूर बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची नदीकिनारी गर्दी होत आहे.