देवळा ; विठेवाडी येथील बंद अवस्थेत असलेला वसंत दादा सहकारी साखर कारखाना उर्जित अवस्थेत येण्यासाठी त्याची विक्री न होता शिखर बँकेने भाडे कराराने चालविण्यास द्यावा ,अशी मागणी शुक्रवारी दि. २ रोजी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदनाद्वारे केली.
या संदर्भात मंत्रालयात सोमवारी दि. ५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील विठेवाडी येथील वसंत दादा सहकारी साखर कारखाना हा अग्रगण्य साखर कारखाना असून ,कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नावारूपास आलेली सहकारी संस्था होती. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चुकलेले आर्थिक नियोजन, कमी झालेली ऊस उत्पादक क्षमता, बँकेचा वाढलेला कर्जाचा बोजा व इतर कारणास्तव काही वर्षांपासून कारखाना अडचणीत सापडलेला आहे. मागील काळामध्ये कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ली. मुंबई (शिखर बँक ) यांनी ताब्यात घेउन प्रथम अशासकीय मंडळाला व नंतर डि. व्ही. पी ग्रुप, धाराशिव यांना भाडेकराराने चालविण्यास दिला होता. परंतु काही वर्ष कारखाना चालवल्या नंतर डी. व्ही. पी ग्रुप ने कारखाना चालविण्यास असमर्थता दाखवल्याने कारखाना सध्यस्थितीत बंद आहे.
यामुळे शिखर बँकेने कारखाना विक्रीची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. त्याची विक्री होऊ नये म्हणून गेल्या आठवड्यात कारखाना कार्यस्थळावर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने उपोषण देखील करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सभासदांनी याला प्रखर विरोध दाखवला. कारखाना बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार वर्ग व कारखाण्याच्या सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून सर्वांची भावना वसंत दादा सहकारी साखर कारखाना विक्री न होता भाडे कराराने चालविण्यास शिखर बँकेने द्यावा अशी आहे. अशी मागणी यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून केली असून, ना पवार यांनी याकामी सकारात्मक भूमिका घेऊन यासाठी सोमवारी मंत्रालयात शिखर बँकेच्या संबंधित सर्व घटकांसोबत बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले . यावेळी आमदार नीतीन पवार, वसाका बचाव कृती समितीचे निमंत्रक सुनील देवरे, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, उमराना बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे , राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते उदयकुमार आहेर आदी उपस्थित होते .