सिडको नाशिक : पूर्वजांचे श्राद्ध घालत त्यांना आगारी देताना तूपासह ज्वलनशील पदार्थ टाकल्यामुळे लागलेल्या आगीत ६७ वर्षीय नागरिक भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २९) डिजीपीनगर क्रमांक २ येथील गुलमोहर कॉलनी परिसरात ही घटना घडली. दिनकर मार्तंड काळे असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनकर काळे (रा. गणेश एट्रिया आपर्टमेंट गुलमोहर कॉलनी, डीजीपी नगर २) हे सकाळी ११ वाजता फ्लॅटच्या गॅलरीत पितरांना आगारी देत होते. यावेळी तूप तसेच आहुती जाळण्यासाठी ज्वलनशील पदार्थ टाकल्याने आगीचा भडका उडला. त्यात काळे यांच्या कपड्यांनी पेट घेतल्याने ते गंभीर भाजले. त्यांना त्वरित मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. काळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुली असा परिवार आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी नोंद केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार रमेश टोपले करीत आहेत.