

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले असून नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता पाऊस थांबला असून चार दिवसांत तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत, असे आदेश जलसंपदा मंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला दिले आहेत.
महाजन यांनी शुक्रवारी (दि. १०) त्र्यंबकरोडवरील रस्त्यांची पाहणी केली.अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह त्यांनी मायको सर्कलवरील खड्ड्यांची पाहणी करून प्रशासनाला निर्देश दिले आहेत. लवकरच नाशिक खड्डेमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगत महाजन म्हणाले, मनपाकडून आता खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. चांगल्या दर्जाचे मटेरियल वापरण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सिमेंटचे रस्ते केले जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील २० ते २५ वर्षे तरी रस्त्यात खड्डे पडणार नाही, असे महाजन यांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे उपस्थित होते.
सलाईन लावत वेधले प्रशासनाने लक्ष
निफाड : पिंपळस ते येवला मार्गाची झालेली दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवार (दि. १०) निफाड येथे रास्ता रोको केला. आंदोलनकर्त्यांनी सलाईन लावून आणि अंगावर गोधडी पांघरून रस्त्यावर ठिय्या दिला. निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गुरव आणि नायब तहसीलदार यांच्या मध्यस्थीने झालेल्या या यशस्वी चर्चेनंतर तब्बल सव्वा दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
सव्वा दोन तास वाहतूक ठप्प
युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी घेतला. छत्रपती संभाजीनगर मार्गावर तब्बल सव्वा दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या
दिवाळीपूर्वी बुजविण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व बीओटी विभागाचे अधिकारी शेळके, मोहिते, चौधरी यांच्यासह कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी दिवाळीपूर्वी सर्व खड्डे युद्धपातळीवर बुजवून रस्ते वाहतुकीस योग्य करण्याचे ठोस आश्वासन दिले.