नाशिक : सातपूर येथील राज्य कर्मचारी विमा योजना रुग्णालय अर्थात इएसआय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. सरोज जवादे व वैद्यकीय प्रशासन अधिकारी राजश्री जवादे-पाटील या दोघा वादग्रस्त बहिणींकडून अखेर त्यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. संचालकांकडून याबाबतची कारवाई केली असून, त्यांच्या जागी अनुक्रमे डॉ. वसंत भोजणे व डॉ. सुहास फालक यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाविरुद्ध तक्रारी वाढल्या होत्या. विशेषत: मनमानी कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरोज जवादे व प्रशासन अधिकारी राजश्री जवादे यांच्यावर विविध संघटनांकडून कारवाईची मागणी केली जात हाेती. सीटूसह महाराष्ट्र दुर्घटनाग्रस्त कामगार संघटनेनी देखील रुग्णालयाला भेट देत याबाबत जाब विचारला होता. तसेच मुंबईस्थित संचालकांसह आयुक्तांकडे दोघा बहिणींच्या तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी राज्य कामगार विमा योजनेचे संचालक डॉ. श. गो. कोळनूरकर यांनी जवादे बहिणींच्या बदलीचे आदेश काढत त्यांना मुळ पदावर पाठविले आहे. तसेच डॉ. वसंत भोजणे व डॉ. सुहास फालक यांच्याकडे पदभार सोपविला आहे.
इएसआय रुग्णालयाविषयी वाढत्या तक्रारी लक्षात घेता, खासदार वाजे यांनी संसदेत याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी रुग्णालय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून चालविण्यात यावे, अशी मागणी केली.
जानेवारी २०२० मध्ये वैद्यकीय अधीक्षक सरोज जवादे यांच्याविरोधात कामगारांनी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. त्याची दखल घेत शासनाने लोक अदालत घेत जवादे यांना पदावरून हटविले होते. मात्र, पुन्हा त्यांच्याकडेच पदभार सोपविण्यात आला होता.
भाजपे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी थेट केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनीही नाराजी व्यक्त करीत, वरिष्ठ पातळीवर तक्रार केली होती. अपघातग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य कर्मचारी विमा महामंडळ सदस्य कैलास मोरे यांनी स्वाक्षरी मोहिम आंदोलनाची तयारी सुरू केली होती.
दोन्ही डॉक्टर बहिणींच्या बदलीचे आदेश स्वातार्ह आहेत. इएसआय रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांचे खासगी रुग्णालये असून, या डॉक्टरांवर देखील कारवाईची गरज आहे. हे डॉक्टर इएसआय रुग्णालयापेक्षा स्वत:च्या खासगी रुग्णालयाला अधिक वेळ देतात.
कैलास मोरे, अध्यक्ष, अपघातग्रस्त कामगार संघटना.